Header Ads

यापुढे माण दुष्काळी राहणार नाही, चारा छावणी ही शेवटची ठरणार : पालकमंत्री विजय शिवतारे satara

सातारा : राज्यावर ओढवलेल्या दुष्काळी संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने ठिकठिकाणी जनावरांच्या चारा छावण्या सुरु केल्या आहेत. ही चारा छावणी शेवटची ठरावी यासाठी येथिल सिंचन योजना त्वरित मार्गी लावणार असल्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. येथील माणदेशीने सुरु केलेल्या चारा छावणीला भेट दिली आणि छावणीतील शेतकऱ्यांना शिधा वाटप योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते, यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे  पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शिवसेनेचे नेते रणजीतसिंह देशमुख, तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी, नगरसेवक गणेश रसाळ, छावणी प्रमुख विजय सिन्हा, माजी नगराध्यक्ष रविंद्र विरकर आदी प्रमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. शिवतारे म्हणाले की राज्यातील दुष्काळी संकटाचा सामना करताना सरकारने ठिकठिकाणी जनावरांच्या चारा छावण्या सुरु केल्या आहेत. जनावरांना चारा पुरवण्याची जबाबदारी ही राज्य सरकरची असून सरकार  ती पूर्ण क्षमतेने निभावत आहे. तर जनावरांसोबत चारा छावणीत राहणाऱ्या शेतकऱ्यांना शिधावाटपासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. जोपर्यंत पाऊस पडुन जनावरांना चारा उपलब्ध होत नाही तोपर्यंत या चारा छावण्या सुरुच राहणार असुन तेथील शेतकऱ्यांना धान्य उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  गत 5 वर्षाच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन काम करताना आपण येथील सिंचन योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे येत्या डिसेंबर पर्यंत या योजना मार्गी लागुन माणच्या शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे ना. शिवतारे यांनी सांगितले तसेच एकदा या तालुक्यात पाणी आले की याठिकाणी मोठमोठे उद्योग सुरु होवुन येथील बेरोजगारी ही संपेल यासाठी माझा प्रयत्न असुन याशिवाय येथील दुष्काळ कायमचा संपणार नसल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे पाटील बोलताना म्हणाले की शेतकरी हे जनावरे पोटच्या पोरांप्रमाणे संभाळत असतात. जनावरांवर प्रेम कसे करायचे ते येथील शेतकऱ्याकडुन शिकण्यासारखे आहे, मात्र दुष्काळामुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला असुन या बळीराजा सोबत त्यांचे पशुधनही धोक्यात आले आहे त्यांना या संकटातुन बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे, मात्र जनावरांसोबत चारा छावणीत राहणार्या शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न निर्माण झाल्यानेच आज शेतकर्यांना धान्य वाटण्यात येत आहे, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.

ना. शिवतारे यांच्या हस्ते धान्याचे व पेंडीचे वाटप

यावेळी चारा छावणीत जनावरांसोबत राहणाऱ्या शेतकऱ्यांना धान्याचे तर शेतकऱ्यांकडे असलेल्या शेळ्यांसाठी गोळी पेंडीचे वाटप ना. शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले. छावणी चालक विजय सिन्हा म्हणाले की आज ५ महिन्यांहुन अधिक दिवसांपासुन आम्ही येथे जनावरांची चारा छावणी चालवत असुन सुमारे ८ हजारांहुन अधिक जनावरे येथे दाखल झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी धनाजी शिंदे, शिवदास केवटे, यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.

No comments