Header Ads

जिल्ह्यातील पाणी वाटपाच्या अध्यादेशाने खा.उदयनराजेंची तोफ धडाडली ; रामराजेंवर सडाडून टीका satara

सातारा : नीरा खोऱ्यामध्ये भाटघर, वीर, नीरा-देवधर व गुंजवणी धरणे झाली. या धरणांचे पाणी ६0 टक्के नीरा डावा व ४० टक्के उजव्या कालव्यातून सोडण्यात येत होते. ही मान्यता ३ एप्रिल २०१७ रोजी संपुष्टात आली. तसेच मुदतवाढीचा प्रस्ताव ३ एप्रिल २०१७ रोजी पाठवण्यात आला. पण अद्यापही शासनाने त्याला मान्यता दिलेली नाही. तरीही पाणी सोडण्यात येत असल्याने आक्रमक झालेल्या खा.श्री.छ.उदयनराजे भोसले व माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी या पाणीवाटपाला विरोध करुन सातारा जिल्ह्याची अस्मिता जपली आहे. सातारा जिल्ह्याचे पाणी वाटपाच्या अध्यादेशाने भगिरथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर आता सडकून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका होत आहे. खा.उदयनराजे व आ. जयकुमार गोरे यांनी आक्रमक व्हावे म्हणून आता या पाणीप्रश्नाबाबत माहितीचा दारुगोळा तोफेत टाकण्यासाठी काही अधिकारीसुद्धा पडद्यामागे हालचाल करु लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना खा.उदयनराजे म्हणाले, लोकांच्या हक्कांसाठी भांडतो, तर आम्हाला गुन्हेगार, मूर्ख ठरवतात. राजकीय वरदहस्त असल्याने सातारा जिल्ह्याचे पाणी पळविण्यास मूक संमती देणारे सध्या सातारा जिल्हा परिषद व राज्य पातळीवरील पदे भोगत आहेत. खंडाळा तालुक्यात पुनर्वसन झालेल्या धरणग्रस्तांना हुसकावून लावणान्यांमध्ये जिल्ह्यातील क्रीयानिष्ठ, संकुचित बुद्धिचे राज्यकर्ते आहेत. राज्यकर्त्यांनीच जिल्ह्यातील जमिनींचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करुन खंडाळा, लोणंद, शिरवळ येथील जमिनी लाटलेल्या आहेत. या व्यवहाराची संपूर्ण चौकशी व्हावी. ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांनी पुरावे घेवून आल्यास त्यांना न्याय देण्याचे काम मी करणार आहे. पत्रकारांनीही या भागात हिंडून येथील गरीब शेतक-यांवर कोण अन्याय करत आहे, अशा तिघांची नावे हुडकून काढावीत, असे आवाहन केले. लोकशाही जोडा, व्हीएम तोडा असा नारा देवून त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.

पाणी वाटपाबाबत जे झाले, ते जनता सहन करणार नाही. मांजर डोळे बंद करुन दुध पीत असले तरी दूध संपले की ताटलीचा आवाज होतो. सातारा जिल्ह्यातील राजकीय, शिक्षण चळवळ सुरु केली, त्याच जिल्ह्यात पाणी न पोहोचविण्याचे काम काहींनी केले आहे. काही अधिकारी, पुढारी यांच्या संगनमताने सातारा जिल्ह्यावर अन्याय झालेला आहे. आम्ही भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला, तर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यास लावले जाते, अशीही खंत उदयनराजेंनी बोलून दाखवली. २२ जून रोजी एमआयडीसीच्या विकासाबाबत बैठक होणार असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत १५ वर्षापूर्वी विचार केला पाहिजे होता. आता विचार करुन काही फरक पडणार नाही. जिल्ह्यात कृषी विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालय येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला डी. जी. बनकर, सुनिल काटकर, संग्राम बर्गे उपस्थित होते.

No comments