Header Ads

गेली ११ वर्षे कॅनॉलची कामे कथित भगीरथ उर्फ भोगीरथाने रखडवली : खा.उदयनराजे satara

सातारा : निरा-देवघर धरणाचे काम सन २००८ मध्ये पूर्ण झाले आहे. तसेच या धरणाचा उजवा कालवा एकूण १९८ कि.मी.चा आहे. पैकी ६५ कि.मी.कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. भोर तालुक्यानंतर खंडाळा आणि पुढे फलटण तालुक्यातील उजव्या कॅनॉलचे काम गेल्या सुमारे ११ वर्षात वाघोशी गावाचे पुढे सरकले नाही त्यामुळे नीरा उजव्याकालव्यावरची डोंगरीभागातील जनता पाण्यापासून वंचित राहली. हे जर काम झाले असते तर खंडाळा आणि फलटण तालुक्यातील शिवारे भिजली गेली असती. परंतु गेली सुमारे ११ वर्षे कॅनॉलची कामे कथित भगीरथ उर्फ भोगीरथाने रखडवली, म्हणूनच निषेधच करायचा असेल तर कथित भगीरथ उर्फ भोगीरथाचा निषेध केला पाहीजे, असा खरमरीत टोला सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.

खंडाळा तालुक्यातील अहिरेगावांत तसेच तरडगांव येथे रास्ता रोको, साखरवाड़ी व राजुरी येथे निषेध फे-या आयोजित करुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा निषेध करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे नमुद केले आहे की, कोणताही माणुस एक दोन नव्हे तर तब्बल ११ वर्षे, स्वतःचं घर उपाशी ठेवून दुस-या घरच्या व्यक्तींना जेवू घालत असेल तर त्याच्यासारखा कृतघ्न माणुस शोधुन सापडणार नाही, असा माणुस भगीरथ नव्हे तर आता भोगीरथ म्हणून ओळखला जायला लागला आहे. या भोगीरथाची तळी उचलण्यासाठी काही लोक आमचा निषेध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक निरा देवघरचे पाणी भोर,खंडाळा,फलटण व माळशिरस तालुक्यासाठी राखिव ठेवण्यात आलेले आहे. या तालुकयांचे हक्काचे आणि राखुन ठेवलेले पाणी मिळू नये म्हणून कथित भगीरथाने खंडाळा,फलटण तालुक्यातील उजव्या कालव्याची कामे रखडवली व त्यांना या पाण्यापासून वंचित ठेवले. आता निरा-देवघर उजव्या कालव्याचे पाणी खंडाळा तालुक्यातील लोणंद,वाघोशी, वगैरे १० गावांना तर फलटण तालुक्यातील पाडेगांव वगेरे ६१ गावांना मिळणार आहे. ही सर्व गावे त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून गेली ११-१२ वर्षे वंचित ठेवण्यात आलेली होती. तसेच खंडाळा तालुक्यातील ज्यांना नीरा उजव्या कालव्याचे पाणी मिळते त्यांचे किंचतही पाणी कमी होणार नाही. या जुन्या भागाला वीर-भाटघर धरणाचे पाणी उपलब्ध आहे.

खंडाळा आणि फलटण तालुक्याला स्वत:च्या हक्काचं पाण्यापासून वंचित ठेवून, या कथित भगिरथ उर्फ भोगीरथाने या भागातील जनतेचा फार मोठा अपमान केला आहे. त्याबदल्यात त्यांनी मंत्रीपद आणि पुढे सभापतीपद पदरात पाडून घेतले आहे. अश्या भोगवादी, विलासी वृत्तीत रमणा-या भोगीरथाने ग्रामिण भागातील जनतेचे किती प्रचंड नुकसान केले आहे याची कल्पना करता येणार नाही. आजपर्यंत पाण्यापासून वाचत ठेवलेल्या भागातील शेतक-यांच्या आत्महत्यांना आणि कर्जबाजारीपणाला हेच भोगीरथ जबाबदार आहेत. सत्य नेहमीच कट असते. तसेच सत्य कधीही लपुन राहात नाही, कधीना कधीतरी ते बाहेर पडतेच, आजपर्यंत भोगीरथाने पाण्यापासून ज्या शेतक-यांना वंचित ठेवले आहे त्या शेतक-यांनी सोसलेल्या वेदनांच्या श्राप-अश्रापांमुळे या भोगीरथाचा पालापाचोळा होणार आहे हे मात्र निश्चित आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.

पाण्याचा प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचा व जीवन मरणाचा असल्याने, राजकारणाच्या पलिकडे जावून, माणुसकी आणि वैधानिक दृष्टीकोनामधुन याकडे पाहीले पाहीजे, याबाबत खंडाळा तालुक्यासह फलटण, माळशिरस भागातील आजी-माजी आमदार, जिल्हापरिषद, पंचायत समिती लोकप्रतिनिधींनी त्यांचे स्वतःचे या विषयावरील मत, एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून व्यक्त केले पाहिजे. संबंधीतांनी जनतेला माहिती अवगत करून दिली पाहिजे. या भागातील लोकप्रतीनिधींची विशेष बैठक जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बोलावून, या प्रकरणाची सर्व माहिती, चौकशी लावून जनतेसाठी खुली करावी.

No comments