Header Ads

गणेश मंडळांनी दडपशाही करुन वर्गणी गोळा केल्यास होणार खंडणीचा गुन्हा दाखल satara

सातारा : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रदुषणाबाबतचे नियम हे इंग्रजीमधून आहेत. याचे मराठीतून भाषांतर करुन पोलीस विभागाने सर्व गणेशोत्सव मंडळांना द्यावे. या नियमांचा अभ्यास करुन हे नियम गणेश मंडळांनी काटेकोरपणे पाळावे, जे गणेशोत्सव मंडळे नियमांचे उल्लंघन करतील, अशा मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले. गणेशोत्सावाच्या निमित्ताने आज शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली अलंकार हॉल येथे संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. या शांतता कमिटीच्या बैठकीला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात काही दिवशी मद्य विक्री बंदीचे आदेश जारी केले जाणार आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, या मद्य विक्री बंदीच्या वेळी ज्या दुकानातून मद्य विक्री होईल त्या दुकानाचे परवाने स्थगित करु. गणेशोत्सव काळात रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे अडचणी निर्माण होत असतील तर अतिक्रमणे काढावीत, यावर पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवळी देखरेख करावी. गणेश मंडळांनी विसर्जनाच्या दिवशी शाडूच्या मुर्ती विसर्जीत कराव्यात. तसेच नागरिकांनीही घरात शाडूच्या मुर्तींची स्थापना करुन या मुर्त्या नागरिकांनी आपल्या बागेतच विसर्जीत कराव्यात. गणेश मंडळांनी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा, यासाठी आत्तापासूनच नियोजन करा. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी शेवटी केले. प्रत्येक गणेशोत्सव मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत आहात असे बॅनर लावावे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी खर्च करण्यास मागेपुढे पाहू नये. देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते, यावेळी पुरुषांची व महिलांची स्वतंत्र रांग करावी. मंडळांनी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. गणेशोत्सव मंडळांनी दडपशाही करुन वर्गणी गोळा करु नये, असे निदर्शनास आल्यास खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील, असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या बैठकीत सांगितले. या  शांतता कमिटीच्या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी,  गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments