Header Ads

साता-यातील महाराष्ट्र स्कूटर्सचा प्लान्ट तातडीने सुरु करा ; शिवेंद्रराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट satara

सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील सर्वात मोठा प्लान्ट असलेली महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लान्ट तातडीने सुरु करुन सातारा औद्योगिक वसाहतीला उर्जीतावस्था प्राप्त करुन द्यावी, अशी आग्रही मागणी करतानाच साता-यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) जिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णालय विभागाच्या इमारतीत सुरु करावे आणि त्यासाठीची पदनिर्मीती व पदनिश्चिती तातडीने करावी, अशी मागणी आ.श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री ना. फडणवीस हे कराड दौ-यावर आले असताना आ. शिवेंद्रराजे यांनी त्यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी व मेडिकल कॉलेज सुरु करण्याबाबतचे लेखी निवेदन त्यांना दिले. यावेळी ना. चंद्रकांत पाटील, ना. सदाभाऊ खोत, ना. डॉ. अतुल भोसले, अविनाश कदम, अमोल मोहिते, राजू भोसले आदी उपस्थित होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दोन्ही मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स ही एक जुनी आणि महत्वाची कंपनी आहे. सदर कंपनीबाबत सरकार आणि बजाज यांच्यात लवादाकडे अनेक वर्ष खटला सुरु होता. खटल्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल श्री. बजाज यांना मान्य आहे. मात्र महाराष्ट्र सरकार सदर निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही श्री. बजाज यांच्या बाजूने निकाल दिला असल्याचे समजते. सातायातील उद्योजकता आणि रोजगार निर्मीतीची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी तातडीने सुरु होणे आवश्यक आहे. या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक लहान- लहान उद्योग सध्या बंद आहेत. यामुळे बेरोजगारीची समस्या जटील बनली आहे. हे लहान- लहान उद्योग सुरुझाल्यास साता-यातील औद्योगिकरणास चालना मिळणार असून बेरोजगारी नष्ट होण्याबरोबरच संबंधीत उद्योगाशी निगडीत कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे. सदर प्रश्नाबाबत यापुर्वीही आपणास निवेदन दिले आहे. कंपनी सुरु होणेसाठी राज्य सरकारने ठोस निर्णय घेणेबाबत आपण स्वतः लक्ष घालावे आणि औद्योगिकरण आणि बेरोजगारीशी निगडीत प्रश्न तातडीने मार्गी लावावा. याबाबत आपण संबंधित अधिका-यांची बैठक बोलवावी, अशी मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, साता-यातील बहुचर्चीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भिजतं घोंगडं कायम आहे. या मेडिकल कॉलेजची इमारत होईल तेव्हा होईल, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या महिला रुग्णालय विभागाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरु करता येवू शकते. ही जागाही शासनाचीच आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी निर्णय घेण्यात यावा आणि यासाठी आवश्यक पदनिर्मीती करुन पदे निश्चित करावीत, अशी मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून दोन्ही मागण्यांबाबत ना. फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, या दोन्ही प्रश्नांबाबत अधिवेशनातही पाठपुरावा करणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवले आहे.

No comments