Header Ads

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज मिळवून देतो अशी फसवणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार : नरेंद्र पाटील satara

कराड : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ काम करत आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेष करून बेरोजगार तरुणांपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे, हा महामंडळाचा मुख्य उद्देश आहे. मात्र महामंडळाकडून कर्ज मिळवून देतो असे सांगून फसवणूक झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अशाप्रकारे फसवणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. कर्ज प्रकरणासाठी महामंडळाचे कार्यालय, तसेच तालुकानिहाय नेमलेले समन्वयक यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी, त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणार्‍या अडचणी दूर करणे, असा या महामंडळाचा उद्देश आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील एकाने कर्ज मिळवून देतो असे सांगून आर्थिक फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अशा फसवणूक करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र बेरोजगार व लघु व्यावसायिकांनी थेट महामंडळाच्या कार्यालयाशी अथवा तालुकानिहाय नेमलेल्या समन्वयकांशी संपर्क साधावा.

लाभार्थ्याने कर्ज प्रकरण अर्जाच्या तीन प्रतीत आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात सादर केल्यानंतर अधिकार्‍यांनी सदर कर्ज प्रकरणांची पडताळणी करुन किफायतशीर असल्याचे तपासून स्थळ पाहणी अहवाल सादर केला जातो. नंतर प्रकरणाची एक प्रत बँकेकडे शिफारस करण्यासाठी पाठविली जाते. बँकेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकरण महामंडळाकडे पाठविले जाते. त्यानंतर प्रकरणाची छाननी करुन महामंडळाकडून बीज भांडवल मंजूर केले जाते व त्यानंतर मंजूर रक्कम जिल्हा कार्यालयाकडे पाठविली जाते. जिल्हास्तरावर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बीज भांडवल बँकेकडे वर्ग केले जाते आणि बँकेमार्फत लाभार्थ्यास कर्ज वितरण केले जाते.

Web: ./Forms/JobScheme.aspx  या वेबसाईटवरुन आपणास ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ घ्यावा सदर वेबसाईटवर योजना या ऑपशनमध्ये आपणास कर्ज प्रकरणासाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच माहिती पूर्ण तयार केल्यानंतर आपण वरील वेबसाईट वरुन ऑनलाईन अर्ज सादर करु शकता. त्या करिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात यावयाची आवश्यकता नाही किंवा कार्यालयाकडून अर्ज घ्यावयाची आवश्यकता नाही. तसेच तयार केलेल्या कागदपत्रांच्या फाईलच्या तीन प्रती ज्यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात कार्यालयातील अधिकारी स्थळ पाहणी करता भेट देतील. कर्ज मंजुरीबाबत अधिक माहितीसाठी तालुकानिहाय समन्वयक तसेच कार्यालयाचा क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहनही ना. नरेंद्र पाटील यांनी केले आहे.

No comments