Header Ads

खा.उदयनराजेंनी घेतली जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट ; वैद्यकीय महाविद्यालय लवकर होणे अत्यंत महत्वाचे : खा.उदयनराजे satara

सातारा : आरोग्य सुविधेबाबत, सर्वसामान्य जनतेला जिल्हा रुग्णालयाचा फार मोठा आधार आहे. जिल्हा रुग्णालयामधुन देखिल चांगली रुग्णसेवा दिली जात आहे. तथापि यामध्ये आमूलाग्र बदल करणेबाबत शल्य चिकित्सक यांनी अधिक प्रयत्नशील रहावे, रुग्णालयातील रिक्त पदांबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री महोदय यांचेकडे आम्ही पाठपुरावा करुच, तथापि डायलेसिस, एक्सरे, ईसीजी, सोनाग्राफी, विविध तपासण्या यामध्ये सातत्यपूर्व सेवा देण्यासाठी सर्वांनीच कटीबध्द राहीले पाहीजे, तरच रुग्णसेवा दिल्याचे समाधान मिळेल अश्या सूचना सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्या. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत आढावा घेवून, याकामी प्रशासकीय बाबी वेळचेवेळी पार पाडव्यात, वैद्यकीय महाविद्यालय लवकर होणे अत्यंत महत्वाचे आहे अशी अपेक्षा व्यक्त केली. सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्व.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयास भेट दिली त्यावेळी ते अनौपचारिक बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गड्डीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सव सौ.डॉ.माने, अस्थिरोग तज्ञ वर्ग डॉ.संजोग कदम,डॉ.चंद्रशेखर घोरपडे, अॅड.दत्ता बनकर, माजी सभापती सुनील काटकर, जितेंद्र खानविलकर प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालयात महत्त्वाची अनेक पदे रिक्त आहेत, त्याबाबत प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहेत, तसेच एमआरआय मशिन,डिजिटल एक्सरे मशिन,व्हेन्टीलेटर, सी.पॅप मशिन,कार्डियाक केअर अॅम्ब्युलन्स, फोटोथेरपी मशिन,हिम.अनिलायझर, वॉटर एटीएम, रुग्णांचे कपडे धुण्यासाठी यंत्र आदींची जनतेकडून मागणी होत आहे, या सर्व मागण्या पुरवण्याबाबत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातुन प्रयत्न सुरु आहेत असा खुलासा प्रशासनाच्या वतीने डॉ.आमोद गड्डीकर यांनी केला. तसेच वैद्यकिय महाविद्यालय मंजूर असल्याने, जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय आरोग्य विभागाकडून वैद्यकिय शिक्षण विभागाकडे वर्ग करण्याबाबतची कार्यवाही आरोग्य विभागाकडे प्रलंबीत आहे असे विशद केले. यावेळी या समस्या सोडवण्यासाठी आम्ही योग्य ते प्रयत्न करीत असून, येत्या काही दिवसांत रुग्णालयाचे हस्तांतरण वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केले जाईल, तसेच रिक्त पदे भरणेबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, आहे त्या परिस्थितीत रुग्णसेवेच सातत्य कायम ठेवण्यात यावे असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगीतले. यावेळी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ.सुधीर बक्षी यांनी सुत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले.

No comments