Header Ads

सावित्रीच्या लेकींचा नायगाव येथे गुण गौरव ; महिलांनो स्वत्:च्या पायावर उभे राहा प्रशासन सर्वोत्तोपरी मदत करेल : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल satara

सातारा : ज्ञानज्योती सावित्रीबाई  फुले यांनी घेतलेल्या कष्टामुळे आज सर्व क्षेत्रात महिला काम करीत आहेत. त्यांची प्रेरणा घेवून इतर महिलांनीही स्वत्:च्या  पायावर उभे रहावे यासाठी  त्यांच्या कुटुंबांनी त्यांच्यावर  विश्वास ठेवून पाठिंबा द्यावा. कोणतीही गरज लागल्यास थेट माझ्याशी संपर्क करा,  मी सदैव मदत करण्यास तयार आहे, असे आश्वासन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव या गावाला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. या निमित्ताने नायगाव येथे महिला मेळावा व गुणवंत विद्यार्थींनी व गुणवंत खेळाडूंचा सत्कार आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल बोलत होत्या. या कार्यक्रमास जि.प. चे  मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले, खंडाळयाचे तहसिलदार दशरथ काळे, जिल्हा नियोजन अधिकारी  बी.जे.जगदाळे, महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव, जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक, खंडाळा पंचायत समितीचे सभापती मकरंद मोटे, नायगावचे सरपंच सुधीर नेवसे आदी उपस्थित होते.

नायगाव येथे पाच लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे शासनाने नायगावला ‘ब’ पर्यटनस्थळाचा दर्जा दिलेला आहे.  असे सांगून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, नायगावचा विकास करण्यासाठी प्रशासन कटीबध्द असून सावित्रीबाई सृष्टी उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुस्तका एवढा चांगला मित्र दुसरा असू शकत नाही पुस्तक हे जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. जास्तीत जास्त ग्रंथ, पुस्तके वाचावीत. पुढे जाण्यासाठी ध्येय ठरवले तर परिश्रमाच्या जोरावर ते  गाठता येवू शकते. आपण असे काम करा की, आपले काम इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल. स्वत्:च्या पायावर उभे राहण्यासाठी इच्छा शक्ती तर महत्वाची आहेच याबरोबरच शासनाच्या योजनांचाही लाभ घ्यावा. जोपर्यंत आपल्याला ध्येय गाठता येत  नाही तोपर्यंत मेहतीने प्रयत्न करा. एक दिवस तुम्ही नक्कीच मोठे ध्येय गाठाल. तुम्ही आयुष्यात खूप मोठे व्हा आणि सर्वाना मदत करा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे म्हणाले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगावला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळालेला आहे हे सर्वाच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महिलांनी सक्षम होवून स्वत:च्या पायावर उभे रहावे. महिलांना समाजात योग्य पध्दतीने सन्मान मिळावा यासाठी विचार बदलने गरजेचे आहे. महिलांना पुढे जाण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करुन द्या, असे त्यांनी शेवटी सांगितले.

शासनाने नायगावला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. या निमित्ताने गुणवंत विद्यार्थींनी व गुणवंत खेळाडूंचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला ही अभिमानाची गोष्ट असून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण ठेवणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रस्ताविकात प्रातांधिकारी संगीता चौगुले यांनी सांगितले. शासनाच्या विविध विभागाकडून महिलांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती संबंधित विभागाच्या अधिकऱ्यांनी महिला मेळाव्यात दिली. या  मेळाव्यात विविध विभागाचे अधिकारी, महिला विद्यार्थ्यींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नायगावच्या विकासासाठी शासनाच्या योजना प्रभवीपणे राबवा.

No comments