Header Ads

पालिकेच्या गणेशोत्सव बैठकीला मंडळाच्या कार्यकर्त्याना निमंत्रणच नाही ; निर्णयापेक्षा न्यायालयाचे मार्गदर्शन घेण्याची प्रभारी मुख्याधिकारी रवी पवार यांची सूचना satara

सातारा : साताऱ्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मंगळवारी पालिकेत झालेल्या बैठकीत पुन्हा चर्चेचा बोलघेवडेपणा करण्यात आला. ठोस निर्णयापेक्षा थेट न्यायालयाचे मार्गदर्शन घेण्याची सूचना प्रभारी मुख्याधिकारी रवी पवार यांनी केली. पालिका हद्दीत गणेशोत्सव मंडळे व मूर्तीकार यांच्या समन्वयाने शाडू मातीच्या गणपतीची प्रतिष्ठापना व मूर्तीची उंची या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित असताना केवळ बैठक पार पाडण्याचे सोपस्कार पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडले. या बैठकीला गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याना निमंत्रणच नव्हते तर साताऱ्यातील केवळ सात ते आठ मूर्तीकारांची या बैठकीला उपस्थिती होती. नगराध्यक्ष माधवी कदम, प्रभारी मुख्याधिकारी रवी पवार, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, नगरसेविका लता पवार, संगीता आवळे, विरोधी पक्षनेते अशोक मोने, नरेंद्र पाटील व साताऱ्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत गणेशोत्सवात श्री स्थापना व विसर्जनाचा एक लवचिक आराखाडा बनवावा ज्याचा पालिकेच्या महसूलावर कोणताही परिणाम होणार नाही अशी स्वागतार्ह सूचना नरेंद्र पाटील यांनी मांडली. पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा आग्रह पालिका धरत असेल तर सर्वप्रथम प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची ऑर्डर जी मंडळे देतात त्यांना समज दिली पाहिजे. जे मूर्तीकार महामार्गावर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवतात त्यावर कसा निर्बंध घातला जाणार ? याशिवाय फायबर मूर्ती बनवून वर्षभर ठेवण्याचा मंडळांचा कल वाढतोय त्यामध्येही मूर्ती कारांचे नुकसानच आहे असे विविध मुद्दे मूर्तीकारांच्या वतीने मांडण्यात आले. मूर्तीच्या उंचीचा मुद्दाही चर्चेला आला, मंडळांना वर्षभर फायबरची मूर्ती ठेवावी लागते त्यासाठी पालिकेने अनुदान दयावे अशी सूचना नगरसेवक विजय काटवटे यांनी केली. गतवर्षी विसर्जनाच्या वेळी जो कोर्टरूम ड्रामा रंगला व ऐनवेळी मंगळवार तळ्याला नकार मिळून कृत्रिम तळ्यासाठी पालिकेला धावाधाव करावी लागली उगाच मागील पानावरून पुढे नको अशी सूचना मोने यांनी करत सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. गणेशोत्सव विसर्जन संदर्भात सातारा पालिका उच्च न्यायालयात दाद मागणार होती. त्याचे काय झाले ? हा प्रश्न पुन्हा विजय काटवटे यांनी उपस्थित केला. यावेळी गरज पडल्यास न्यायालयाचे मार्गदर्शन मागवू अशी भूमिका प्रभारी मुख्याधिकारी रवी पवार यांनी मांडली. पालिकेच्या हद्दीत पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी शाडू गणपती व मूर्तीची उंची याची अंमलबजावणी करता येईल. माधवी कदम यांच्या सूचनेला मोने यांनी अनुमोदन दिले. सर्वसाधारण सभेत तसा ठराव घेता येईल असे ते म्हणाले. मात्र संपूर्ण बैठकीत केवळ चर्चाच झाली. येत्या १८ जून रोजी गणेशोत्सव मंडळे व मूर्तीकार यांची पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

No comments