Header Ads

इफ्तार पार्टी हे हिंदू- मुस्लीम ऐक्याचे प्रतिक ; सातायातील शाही मस्जिदमध्ये हजारोंच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी satara

सातारा : पवित्र रमजान महिना चालू असून मुस्लीम बांधवांचे रोजे सुरु आहेत. रोजे सोडण्यासाठी मुस्लीम बांधव इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात. या इफ्तार पार्टीत मुस्लीम बांधवांसह हिंदू बांधवही मोठ्या उत्साहाने आणि बंधुभावाने सहभागी होत असतात. इफ्तार पार्टीतून हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडत असते. इफ्तार पार्टीमुळे हिंदू- मुस्लीम ऐक्याला बळकटी मिळत असून असे कार्यक्रम हिंदू - मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहेत, असे प्रतिपादन आ.श्री.छ. शिवेंद्रसिंहाजे भोसले यांनी केले. सातारा येथील शाही मस्जिद मध्ये सोमवारी रात्री ७ वाजता मुस्लीम बांधवांच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष नासीरभाई शेख, बाबाशेठ तांबोळी, आसिफभाई शेख, नगरसेवक अल्लाउद्दीन शेख, ईरफानभाई बागवान, रफिक शेख, आसद शेख, अस्लमशेठ कुरेशी, अॅड. शाहीद शेख, वाहीद शेख, नावेद शेख, हाजी परवेझ सय्यद, दिलावर पत्रेवाले, नगरसेवक अविनाश कदम, चंदन घोडके, विलास कासार आदी मान्यवरांसह हजारोच्या संख्येने मुस्लीमबांधव उपस्थित होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वत: पंगतीला बसून मुस्लीमबांधवांसमवेत इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे व उपस्थित मान्यवरांनी मुस्लीम बांधवांना येणा-या रमजान ईद सणाच्या शुभेच्छा देवून सामाजिक सलोखा अबाधीत ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, धर्म, जातपात आणि वर्णभेद याला थारा न देता इफ्तार पार्टीमध्ये सर्व जातीधर्मातील लोक गुण्या गोविंदाने सहभागी होतात. सर्व धर्मातील सण आणि उत्सव एकत्रीतपणे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी, सर्व धर्मातील बंधुभाव वाढीसाठी इफ्तार पार्टी हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे. अशा कार्यक्रमांमध्ये सर्वधर्मीय कोणताही भेदभाव न ठेवता सहभागी होवून ऐक्य वाढीला महत्व देतात. आगामी ईद सणानिमीत्त भारनियमन, पाणी टंचाई अशा समस्या निर्माण होवू नयेत, यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करणार असून मुस्लीम बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य देवू, असे आश्वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी दिले.

No comments