Header Ads

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला वांग प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत आढावा satara

सातारा : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी धरणाच्या कामास भेट दिली. तसेच  प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत त्यांना देण्यात येणा-या नागरी सुविधांचा आढावा घेतला.  या भेटीत त्यांनी धरणाच्या कामाची, तसेच धरणामुळे बाधित झालेल्या मौजे उमरकांचन गावातील बुडीत जाणा-या घराची व त्यांच्यासाठी तयार करणेत आलेल्या गावठाणांची पाहणी केली. यावेळी पुणे विभागाचे  उपायुक्त (पुनर्वसन)दिपक नलवडे,  अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन रुपाली आवळे, उपविभागीय अधिकारी,कराड हिम्मत खराडे उपविभागीय अधिकारी पाटण श्रीरंग तांबे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, पाटण तहसिलदार रामहरी भोसले, कराड तहसिलदार अमरदिप वाकडे, , सहा.अभियंता श्रेणी-1  रोहिणी चव्हाण तसेच आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी  प्रकल्पग्रस्तांनी मांडलेल्या सर्व अडचणी समजून घेतल्या.  त्या सोडविणेबाबत संबंधित विभागप्रमुखांना सूचना दिल्या.   गावठाणातील नागरी सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देणेच्या दृष्टीने कालबध्द कार्यक्रम तयार करुन उमरकांचन गावातील बुडीतात जाणा-या घरातील प्रकल्पग्रस्तांना व त्यांच्या जनावरांसाठी तातडीने मोठ्या आकाराचे निवारा शेड बांधून द्यावेत असे निर्देश दिले.  नागरी सुविधा देताना पिण्याचे पाणी व वीज प्रथम प्राधान्याने उपलब्ध करुन देबाबत सूचना दिल्या. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे नेते सुनिल मोहिते, प्रताप मोहिते, जितेंद्र पाटील, गणपत पाटील, शिवाजी शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या आवश्यक मागण्या मांडल्या.  त्या मागण्यांच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांनी अतिशय सकारात्मक दृष्टीकोनातून प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.   जिल्हाधिकारी यांनी वांग मराठवाडी धरणामुळे बुडीतात जाणा-या गावास भेट देवून तेथील प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्याबद्दल प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे आभार मानले.

No comments