Header Ads

लाचखोरांना कोर्टात जास्तीत जास्त व कडक शिक्षा होईल यासाठी अमुलाग्र बदल होत असल्याचा सुषमा चव्हाण यांना विश्वास satara

सातारा : जिल्ह्यातील लाचखोरीला आळा बसवण्यासाठी सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभाग सक्षम असून तक्रारदारांनी नि:संकोचपणे पुढे यावे व तक्रार द्यावी. येत्या काही कालावधीत लाचखोरांना कोर्टात जास्तीत जास्त व कडक शिक्षा होईल यासाठी अमुलाग्र बदल होत असल्याचा विश्वास पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक सुषमा चव्हाण यांनी व्यक्त केला. दरम्यान, शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणेच अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनीही लाचेची मागणी केल्यास त्यांच्या तक्रारीही तक्रारदारांनी निर्भयपणे द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. सातारा येथील विश्रामगृहावर आल्यानंतर त्या प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी एसीबी विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के उपस्थित होते.

सुषमा चव्हाण पुढे म्हणाल्या, लाचखोरीप्रकरणात लोकसेवकाला  शिक्षाच लागेल यासाठी सध्या अमुलाग्र बदल होत आहे. एसीबी विभागाच्या वरिष्ठ पातळीवरुनच याचा अभ्यास होत आहे. विभागातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी सेमिनार घेतले जात आहे. एखाद्या प्रकरणात संशयित आरोपी सुटला तर तो का सुटला? कशामुळे सुटला? कोणते आधार वापरले? याचा प्रामुख्याने अभ्यास केला जात आहेे. भविष्यात अशा केसेसमध्ये त्रुटी राहणार नाहीत यासाठी एसीबी विभाग खबरदारी घेत आहे. एसीबी विभाग सक्षम करत असतानाच न्यायाधिश, सरकारी वकील यांच्याशी एसीबीच्यावतीने समन्वय साधला जात आहे. लाचखोरी संबंधित प्रकरणांचा दोन वर्षात निकाल लागावाच, असे बदल आता झाले आहेेत. नव्याने झालेले बदल हे पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना माहित झाले आहेत. सर्वसामान्य तक्रारदारांशिवाय मात्र हा विभाग चालू शकत नाही. यामुळे लाचेची मागणी झाल्यास त्यांनी एसीबी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

No comments