Header Ads

नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्या प्रयत्नातून आदर्श मातांचा सन्मान ; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम उत्कृष्ट : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले satara

सातारा : सातारा शहरातील प्रभाग क्र. ७ मधील आदर्श मातांचा सन्मान व बाल विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवून नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या या उपक्रमाला मिळालेला उदंड प्रतिसाद कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत सातारा-जावलीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या कार्यक्रमात कौतुक केले. तर आपल्या व्यस्त दौ-यातूनही सातारचे खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी शहरातील मल्हारपेठ येथे भेट देवून नगरसेवक खंदारे यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

सातारा शहरातील मल्हार पेठेत कष्टकरी, मजूर, कामगार मोठ्या संख्येने राहतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या परंतू चांगली गुणवत्ता असूनही वंचित राहणारी अनेक कुटुंबे आहेत. त्यापैकी काही आदर्श मातांनी आपल्या मुलांना उच्चपदस्थ केले आहे. अशातीलच श्रीमती सोनाबाई जगन्नाथ शिंदे, श्रीमती पुष्पा आनंद तपासे, सौ. मंदा गणेश कारंडे, सौ. नंदा शांताराम चव्हाण यांना सन्मानपत्र, पैठणी, पुष्पगुच्छ व सातारी कंदी पेढे देवून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा आदर्श माता म्हणून गौरव करण्यात आला. त्याचबरोबर प्रभागातील आंगणवाडी ते पाचव्या इयत्तेपर्यंत शिकणा-या विद्यार्थ्यांना कंपास, टिफिन, वह्या, स्केच पेन, अंकलिपी, पेन्सिल, खडू, पाटी, वॉटरबॅग अशा ११ वस्तूंसह दफ्तरांचे मोफत वितरण करण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमाला मुलांच्या चेह-यावर चैतन्य निर्माण झाले होते. या कार्यक्रमात आ.भोसले म्हणाले, नगरसेवक हा विकासकामांसाठी असतो. परंतू बाळासाहेब खंदारे यांनी आज खुऱ्या अर्थाने आपल्या प्रभागातील आदर्श माता व बाल विद्याथ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रोत्साहन दिले आहे. या भागातील विकासकामांत माझे नेहमीच सहकार्य राहील. असा नगरसेवक सर्वच सातारकरांना लाभला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी या उपक्रमाबद्दल मनापासून समाधान व्यक्त केले. तसेच नगरसेवक खंदारे हे जी विकासकामे सुचवतील, ती पूर्ण करण्यासाठी खासदार फंडातून विशेष प्रयत्न करण्यात येतील. माझ्या राजकीय जिवनामध्ये मल्हार पेठेतील नागरिकांनी नेहमीच सहकार्य केले आहे. अशा चांगल्या उपक्रमाला माझी नेहमीच साथ राहणार आहे. नगरसेवक बाळासाहेव खंदारे म्हणाले, माझ्या प्रभागातील आदर्श मातांनी आपल्या मुलांना पोलीस उप अधीक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, शासकीय अधिकारी घडवले आहेत. हे लहान मुलांना लक्षात रहावे, यासाठी या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मी नेहमीच सामाजिक कार्यामध्ये आघाडीवर असतो. त्यामुळे प्रभागानेही तसेच खासदार आमदारांनीही माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. दरवर्षी असा उपक्रम राबविण्याची ग्वाहीही खंदारे यांनी दिली. या कार्यक्रमाला अॅड. दत्ता बनकर, आर. के. सय्यद, माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसले, माजी नगरसेवक बाळासाहेब नाईक, माजी नगरसेवक इन्तेखाव वागवान, ज्येष्ठ मार्गदर्शक जालिंदर तपासे, कुमार तपासे व मल्हार पेठेतील विविध मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक बाळासाहेब खंदारे मित्र परिवाराच्यावतीने यशस्वीरित्या करण्यात आले.

No comments