Header Ads

महिमानगड संवर्धनासाठी वृक्षारोपण ; महिमानगड फौंडेशनचा पुढाकार satara

सातारा : महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर दुर्ग सातारा जिल्ह्यातील या झेंड्याखाली जिल्ह्यातील 22 विविध दुर्ग संवर्धन संस्था एकवटल्यानंतर जिल्ह्यातील दुर्ग संवर्धन चळवळ अधिक गतीमान झाली आहे. याचाच एक भाग म्हणून महिमानगड येथे शिवराज्याभिषेक दिन, शिवपुजन, वृक्षारोपण आणि संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. महिमानगड फौंडेशनकडून वृक्षारोपण करण्यात आले असून प्रत्येक गडकोटावर असे वृक्षारोपण व्हावे, असे मत रूपा बहेनजी यांनी व्यक्त केले. महिमानगड संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या महिमानगड फौंडेशनकडून नुकतेच वृक्षारोपण तसेच शिवपुजन करण्यात आले. त्यावेळी ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालय राजस्थान संचलित दहिवडी राजयोग केंद्राच्या अध्यापिका रूपा बहेनजी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महिमानगड फौंडेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन गोडसे, माजी सभापती भास्करराव गुडंगे, योगिता दिदी, सुभाष पवार, बाळासाहेब म्हेत्रस, मोहन तोडकर, दिपक शिंदे, रावसाहेब देशमुख, पुरूषोत्तम शेडगे, रणजित शिंदे, हडसर किल्ला मरहट्टे प्रतिष्ठान पुणेचे सदस्य व महिमानगडचे ग्रामस्थ उपस्थित होते.

हर्षवर्धन गोडसे यांनी महिमानगड संवर्धनासह दुर्ग सातारा जिल्ह्यातील समुहातील संस्थांकडून सुरू असणारे गडकोट संवर्धनाच्या कार्याची माहिती दिली. तसेच भारतीय वास्तू कलेचे योेग्य पद्धतीने जतन झाले पाहिजे आणि यासाठी महिमानगड फौंडेशन प्रयत्नशील असल्याचे गोडसे यांनी यावेळी सांगितले. रूपा दिदी यांच्या हस्ते शिवपुजन व गडावरील हनुमान मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनीही महिमानगड फौंडेशनला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

हडसर मरहट्टे प्रतिष्ठानकडून श्रमदान....

पुण्याच्या हडसर मरहट्टे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी किल्ल्यावर श्रमदान केले. यावेळी गडाच्या मुख्य महादरवाज्यालगतची माती काढण्यात आली. तसेच दुर्ग भ्रमंती करून उपस्थित लोकांना किल्ल्यावर संवर्धन कार्याची माहिती यावेळी हर्षवर्धन गोडसे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी दिली.

No comments