Header Ads

दुकानदारांनी अनावश्यक खते शेतकऱ्यांच्या माथी मारू नयेत ; शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या दुकानदारांच्यावर कडक कारवाई : जि.प. सभापती मनोज पवार patan

पाटण : पाटण तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता येथील पर्जन्यमान जास्त आहे. पावसाचे सर्व पाणी उताराने वाहून जात असल्याने पाटण तालुक्यात जास्तीत जास्त शेततळ्यांसाठी अनुदान देण्याचा प्रयत्न करू. खते व बी-बियाणांबाबत दुकानदारांनी अनावश्यक खते शेतकऱ्यांच्या माथी मारू नयेत. बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या दुकानदारांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे शेती सभापती मनोज पवार यांनी बैठकीत बोलताना दिला. पाटण पंचायत समितीच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात खरीप हंगाम समन्वय सभा आयोजित करण्यात आली होती त्या वेळी ते बोलत होते. यावेळी पाटण पंचायत समितीच्या सभापती सौ. उज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, समाज कल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती राजेश पवार, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सहाय्यक गटविकास अधिकारी विभूते, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव, विजयराव पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सदाभाऊ जाधव, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी शेळके,  पंचायत समिती सदस्या सीमा मोरे, उज्वला लोहार, रेश्मा जाधव, बबनराव काबंळे, विलासराव देशमुख, प्रतापराव  देसाई, संतोष गिरी, खरेदी  विक्री  संघाचे चेअरमन ऍड. अविनाश जानुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षण व अर्थ सभापती राजेश पवार म्हणाले, यावर्षी आर्थिक बजेट वाढवलेले आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार  नाही यासाठी शेतीविषयक अवजारांसाठी, बियाणांसाठी वाढीव अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना बाजारपेठा उपलब्धही आम्ही करून देतो. उपसभापती राजाभाऊ शेलार म्हणाले, पाटण तालुक्यात एक लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्र असून त्यातील 66 हजार हेक्टर क्षेत्र खरीपासाठी आहे. शेतकऱ्यांना भाताचे ज्यादा बियाणे मिळावे. दुकानदारांनी लिंकींग करता कामा नये. दुष्काळी भागात जेथे पाऊस नाही तेथे विहिरी व शेततळ्यांसाठी ज्यादा निधी दिला जातो. मात्र पाटण तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमान असल्याने येथे जास्तीत जास्त निधी मिळावा. दुकानदारांनी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करून बियाणे देऊ नका. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य प्रतापराव देसाई, तालुका कृषी अधिकारी मोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी पाटण तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती दिली. कृषी अधिकारी प्रशांत शिंदे यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले. बैठकीस सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सरपंच, ग्रामसेवक, बॅंकेचे अधिकारी यांच्यासह शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

No comments