Header Ads

ना.चंद्रकांत दादांनी सांगितला युतीचा फॉर्म्युला ; भाजप १३५ व शिवसेना १३५ तर मित्रपक्षांसाठी १८ जागा maha

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता युतीने आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतही शिवसेना भाजप एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून पन्नास-पन्नास टक्क्यांचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विधानसभेसाठी शिवसेना १३५ आणि भाजप १३५ जागांवर लढणार असून मित्रपक्षांसाठी १८ जागा सोडण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मराठवाड्यातील दुष्काळी भागातील कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना भाजपा विधानसभा निवडणुका एकत्रच लढवतील. तसेच यामध्ये कोणताही बदल होणार नाही. सर्व २८८ जागांवर युती लढणार असून १३५ जागांवर भाजपा आपले उमेदवार देणार आहे. तसेच १३५ जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करणार असून १८ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. महायुतीत शिवसेना आणि भाजपा हे मुख्य पक्ष असून रामदास आठवले यांचा रिपाइं, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम आणि सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना हे घटकपक्ष आहेत. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. त्यामध्ये भाजपाला १२२ तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या.

No comments