Header Ads

वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू ; वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी khatav

मायणी : अनफळे येथील मारुती राम आडके वय-७० यांचा शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास सर्पदंशाने मृत्यू झाला. उपचार वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा यासाठी मृतदेह पाच तासाहून अधिक काळ मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवला. दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती आडके यांना शनिवारी (8 जून) सायंकाळी आठच्या सुमारास शेताजवळ सर्पदंष झाला. त्यानंतर ते मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. या ठिकाणी असलेल्या आरोग्य सेविकेने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वडुजला जाण्यास सांगितले. त्यानंतर संबंधित आडके त्यांच्या नातेवाईकांनी खासगी वाहनाने वडुजला नेले. वडुज येथून रुग्णवाहिकेने आडके यांना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. रविवारी सकाळी पाच वाजता आडके यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच अनफळे येथील त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थ मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा झाले.  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. मात्र कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन संबंधित अधिकारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत सुमारे पाच तास आडके यांचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक धरणीधर कोळेकर, पोलीस पाटील प्रशांत कोळी, हवालदार गुलाब दोलताडे, नवनाथ शिरकुळे, नितीन काळे यांनी  बंदोबस्त ठेवला होता.

चौकशी करून अहवाल देणार

प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वितीन फाळके सकाळी दहाच्या दरम्यान तेथे आले. मायणी प्राथमिक आरोग्य केंद्र, वडुज ग्रामिण रुग्णालय, मायणी व वडुज येथील 108 रुग्णवाहिका यांची चौकशी करुन आठ दिवसांत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात येईल. दोषीवर योग्य कारवाई करण्यात येईल. तसेच आठ दिवसांत मायणीत कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी देण्याची हमी डॉ. फाळके यांनी दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. 

No comments