Header Ads

फलटणमध्ये व्यापाऱ्यावर खुनी हल्ला ; एक संशयित अटकेत crime

फलटण : लूटमार करण्याच्या हेतूने येथील एका व्यापाऱ्याच्या आणि मदतीला आलेल्या त्याच्या मुलाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दोघांना चाकूने भोसकून गंभीर जखमी करण्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी शहरातील व्यापाऱ्यांनी काही काळ दुकाने बंद ठेवून पोलिसांना निवेदन दिले.

प्रीतम गांधी रा. सिटी बज़ारसमोर, लक्ष्मीनगर, फलटण यांचे अरविंद क्‍लॉथ हे कपड्यांचे दुकान असून रात्री साडेनऊ वाजता दुकान बंद करून ते जवळच असणाऱ्या घरी जाताना घराजवळील पार्किंगमध्ये दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांची बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला. प्रीतम गांधी यांचा मुलगा पार्श्‍व वय-१७ याने हा प्रकार पाहताच तो पळत आला. त्याने तिघांना आरड़ाओरड करीत विरोध केला असता तिघांपैकी एकाने आपल्या जवळील चाकू प्रीतम गांधी यांच्या पाठीत खुपसला. तिघांनी दोघांना मारहाण केली आणि बॅग हिसकावून दुचाकीवरून पळून जाऊ लागले. यावेळी पार्श्‍वने एकाला गाडीवरुन खाली पाडून पकडून ठेवले. आरड़ाओरड ऐकून बाजूचे नागरिक आले. त्यांनी पार्श्‍वने पकडलेल्या संशयिताला पकडून ठेवले. इतर दोघे मोटरसायकलवरुन पळून गेले. पकडलेल्या संशयिताचे नाव अनिकेत नरेंद्र कदम वय-१९, रा. सगुनामाता नगर, मलटन, ता. फलटण असे आहे. गांधी पिता-पुत्रांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या बॅगमध्ये किती पैसे होते, हे समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती समजताच शहरातील संतप्त व्यापाऱ्यांनी आज सकाळी दुकाने बंद ठेवून फलटण शहर पोलिस ठाण्यात येऊन पोलिस निरीक्षक प्रताप पोमन यांना निवेदन दिले. निवेदनाद्वारे आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना फरारी संशयितांना लवकर पकडून त्यांच्यावर कड़क करवाई करण्याची मागणी केली.

No comments