Header Ads

खटाव, माणसह पाटण तालुक्‍यातील 20 युवकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक crime

सातारा : रेल्वेमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने नागठाणे येथील युवकाची 3 लाख ऐंशी हजाराची फसवणूक केल्याचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी अभिजीत शंकर साळुंखे (रा. नागठाणे, ता. सातारा) याने चौघांविरोधात तक्रार दिली आहे. सचिन केपन्ना तरफदार (रा. मुतनाळ ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अमोल गोपीचंद मदनकर व त्याची पत्नी रश्‍मी मदनकर (दोघे रा. सेवादल नगर, नागपूर) भाऊसाहेब शिवाजी शिंदे (रा. लेंगरे जि. सांगली सध्या रा. धोंडेवाडी, ता.खटाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बोरगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, साळुंखे व भाऊसो शिंदे हे जुने मित्र आहेत. 2017 मध्ये शिंदे याने साळुंखे यांची सचिन तरफदार याच्याशी मुंबईत ओळख करून दिली. त्यानंतर तरफदार याने साळुंखे व त्याचा मित्रांची अमोल मदनकर याच्याशी पनवेल येथे ओळख करून दिली. दरम्यान, अमोलने आपण रेल्वे खात्यात अभियंता म्हणून नोकरीस असल्याचे साळुंखे यांना सांगून त्याचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर तुम्हाला रेल्वेत नोकरी करायची असल्यास प्रत्येकी 3 लाख ऐंशी हजार रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले. साळुंखे व मदनकर यांच्या वडीलांची चर्चा झाल्यानंतर मदनकरने निलेश कोकणे याच्या बॅंक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले होते. त्यानंतर साळुंखेंच्या वडीलांनी दि. 27 जुलै 2017 रोजी नागठाणे (ता. सातारा) येथे निलेश कोकणे याच्यासमक्ष तरफदार याच्याकडे 1 लाख 77 हजार रुपये रोख दिले.

त्यानंतर सप्टेंबर 2017 मध्ये साळुंखे यांना रेल्वेमध्ये नियुक्ती झाल्याचे पत्र घरी आले. त्यानंतर ते खटाव, माण तालुक्‍यातील मित्रांसह कलकत्ता येथे नोकरीवर हजर होण्यासाठी निघाले. तेव्हा अमोलने तुम्हा तिघांची नियुक्ती कलकत्त्याला नसून मुंबईला झाल्याचे फोनवरून सांगितले. तरफदारने अमोलची पत्नी रश्‍मीसोबत साळुंखे याचे बोलणे करून दिले. त्यावेळी रश्‍मी हिने आपण रेल्वेत उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगत तुम्हाला एकूण तीन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर साळुंखेच्या वडीलांनी दि. 14 सप्टेंबर रोजी 2 लाख 26 हजार रुपये सचिन तरफदार याच्याकडे रोख दिले. दि. 15 सप्टेंबर रोजी उंब्रज येथील आयसीआयसीआय बॅंकेतून अमोल याच्या खात्यावर 99 हजार रुपये तर स्टेट बॅंक शाखा कोरेगाव येथून 25 हजार रुपये भरले. मात्र, त्यानंतर संशयितांनी साळुंखे याला नोकरी लावली नाही, तसेच त्यांचे घेतलेले पैसेही परत दिले नाहीत. त्यानंतर साळुंखे याने अधिक चौकशी केली तेव्हा त्याच्याप्रमाणेच वीस तरूणांची फसवणूक केल्याचे समजल्यानंतर या सर्व तरूणांनी नागपूर येथे मदनकर याला भेटून पैशाची मागणी केली तेव्हा त्याने 41 लाख 90 हजाराचा व 23 लाख 50 हजाराचा असे दोन धनादेश या तरूणांना दिले होते. मात्र, ते धनादेश अद्याप वठले नसल्याने अखेर अभिजीत साळुंखे याने बोरगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी करत आहेत.

No comments