Header Ads

रयतचे २ विद्यार्थी यंग सायंटीस्ट म्हणून‘इस्त्रो’सारख्या संस्थेमध्ये गेल्याने अण्णांच्या स्वप्नांची पूर्तता : खा.शरद पवार satara

सातारा : गेल्या १० वर्षात रयत शिक्षण संस्थेने सातत्याने गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले त्याचे आज यशात रुपांतर झाले आहे. शिक्षणाच्या विस्तारा बरोबरच गुणवत्तावाढ आवश्यक आहे. संस्थेचे २ विद्यार्थी यंग सायंटीस्ट म्हणून‘इस्त्रो’सारख्या संस्थेमध्ये निवडले गेले. यामुळे अण्णांच्या स्वप्नांची पूर्तता होत आहे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेत पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६० व्या पुण्यतिथी कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी चेअरमन प्रा. डॉ. एन.डी. पाटील, संस्थेचे व्हा. चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई चौगुले, जेष्ठनेते आमदार भाई गणपतराव देशमुख, श्रीमती मीनाताई जगधने ,आ. दिलीप वळसे पाटील, आ.अजितदादा पवार, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ.शशिकांत शिंदे, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आ. विश्‍वजित कदम, आ. बाळाराम पाटील, जि. प. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संजीवकुमार पाटील,  बबनराव पाचपुते, अ‍ॅड. राम कांडगे,  प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी यांच्याबरोबरच रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, जनरल बॉडी सदस्य, सर्व कर्मवीर कुटुंबीय व संस्थेतील विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व रयतसेवक उपस्थित होते.

गुणवत्तेच्या संबंधात रयत शिक्षण संस्थेने विविध क्षेत्रात केलेल्या कामाचा परामर्श घेताना पवार पुढे म्हणाले, शेती क्षेत्र, कौशल्य विकास आणि संवाद कौशल्य या जीवनाच्या विविध क्षेत्रात कर्तृत्ववान पिढी उभी करण्यासाठी रयत शिक्षण संस्था काम करीत आहे, याचा अभिमान वाटतो. कोल्हापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शेतीमध्ये ऊस, केळी, फळबाग इ.उत्पादन ठिबक सिंचन पद्धतीने करून आधुनिकता आणण्याचे काम आपण करीत आहोत. हे सर्व शेतकर्‍यांना मार्गदर्शक असून विज्ञानाचा आधार घेऊन शेती करावी, हाच संदेश यातून मिळतो. उत्पादन वाढीसाठी जगामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या कामाची माहिती देताना ते म्हणाले ‘अमेरिका व ब्राझील या देशात तेथील सर्वांनी तंत्रज्ञान आवश्यक मानल्यामुळे तेथील उत्पादनात वाढ झाली. महाराष्ट्रात शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधक असून पाच हजार पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी शेती, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायामध्ये काम केले आहे. दक्षिण कोरिया हा देश महाराष्ट्रापेक्षा निम्मा असून त्याने स्किल डेव्हलपमेन्ट मध्ये चमत्कार केला आहे. निवडणुकीत उभे राहायचे असेल तर किंवा कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तेथे  स्किल डेव्हलपमेन्ट कोर्स तेथील नागरिकांना कंपल्सरी आहे.रयत शिक्षण संस्थेत अनेक उत्तम विद्यार्थी आहेत. पण कम्युनिकेशन बाबतीत अजून वाढ करण्याची आवश्यकता आहे’. यापुढे कोणत्याही प्रकारचे  ज्ञान प्रभावीपणे मांडावे, असे आवाहन त्यांनी केले.

ठाणे जिल्ह्यातील मोखाडा येथील आदिवासी बहुल भागातील रयतच्या शैक्षणिक संकुलासाठी  रामशेठ ठाकूर यांनी 1 कोटी, पवार चॅरीटेबल ट्रस्ट यांचेकडून 1 कोटी आणि रयत शिक्षण संस्थेकडून 1 कोटी असे मिळून 3 कोटी रुपये देण्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले. दिवंगतपतंगराव कदम यांनी रयत शिक्षण संस्थेची जी सेवा केली त्यांच्या स्मरणार्थ संस्थेच्या रामानंदनगर येथील महाविद्यालयास डॉ. पतंगरावजी कदम यांचे नाव देण्याचा निर्णय यावेळी पवार यांनी जाहीर केला.

प्रास्ताविक व स्वागत रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्रिं. डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी केले. तर रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या  संपूर्ण शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. बदलत्या  शैक्षणिक धोरणानुसार रयत शिक्षण संस्था कशा पद्धतीने वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट केले.  आ. विश्‍वजित कदम यांनी कदम कुटुंबियांच्या वतीने 1 कोटी रुपयांची देणगी रयत शिक्षण संस्थेस दिली. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेतील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक, देणगीदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चालू वर्षात रयतच्या ज्या महाविद्यालयांनी नॅक पुनर्मूल्यांकनात ‘ए+”ए’ श्रेणी प्राप्त केली तसेच ज्या महाविद्यालयांना स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला त्या सर्व महाविद्यालयांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. या सर्व सत्कारांच्या अहवालाचे निवेदन संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव विलास महाडीक यांनी केले.

रयत विज्ञान परिषदेच्या ‘रयत विज्ञान पत्रिकेचे’ व ‘कौशल्य विकास मार्गदर्शन पुस्तिकेचे’ प्रकाशन यावेळी शरद पवार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेतील गुणवंत शाखांना कर्मवीर पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. आभार रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments