Header Ads

पसरणी घाटात कामगार दिनी कामगारांचे भर उन्हात शोषण satara

सातारा : महाराष्ट्र दिनापूर्वी दि. १ मे जगभरात हा कामगार दिन म्हणून साजरा होतो. या दिवशी जगातील कामगारांनो एक व्हा, अशी हाक दिली होती. तेव्हा पासून जगभरात कामगार दिन या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता कामगारांना सार्वजनिक सुट्टी देवुन त्यांचा गौरव केला जातो. परंतू पाचगणी-वाई रस्त्यावरील पसरणी घाटात भर उन्हात कामगारांचे शोषण चालले होते. आणि हे शोषण पाहणार्‍या अनेक पर्यटकांनी याबाबत गांधारीची भूमिका घेणार्‍या संबंधित विभागाच्या र्दुलक्षितपणा बाबत नाराजी व्यक्त केली आहे.

दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आस्थापनाने अनेक विभागांना सुट्टी दिली होती. त्यामुळे अनेक पर्यटकांनी या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणच्या पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. सामाजिक जाणीव असणार्‍या अनेकांनी सातारा जिल्ह्यातील चार गावातील महाश्रमदानाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानुसार सोळशी, चिलेवाडी, शिंदे बुद्रुक, वरूड या ठिकाणी विविध शहरातील नागरिकांनी पाणी फाउंडेशनच्या जलमित्र व्हा, यासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार अनेकजण सहभागी झाले होते. मात्र इतरांनी सुट्टीचा आनंद स्वकुटुंब व मित्रपरिवारा समवेत घालवला होता. पण सकाळी नऊ वाजल्यापासून पाचगणी-वाई येथील पसरणी घाटातील रस्त्यावर पोटाची भूक भागविण्यासाठी महिला व पुरूष कामगार हातात घमिले व फावडे तसेच झाडू घेवून कामगार दिनी राबत होते. आणि ही बाब वाहतूक कोंडी मुळे अडकून पडलेल्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होते. वास्तविक पाहता कामगार दिनी कामगारांना अत्यावश्यक सेवा वगळून सुट्टी देण्यात येते. परंतू सातारा जिल्ह्यात या दिवशी दिड ते दोन हजार कामगार राबत होता. कोणत्याही प्रकारे आस्थापनाने त्याची माहिती दिली नव्हती. तसेच जिल्हा प्रशासन कामगार आयुक्त व संबंधित विभागाने याची तपासणी सुद्धा केली नाही. त्यामुळे कामगार दिनी कामगारांचे शोषण करणार्‍या प्रवृत्तीवर कारवाई होत नाही. याचाच फायदा अनेकांनी घेतला आहे. अशा अधिकार्‍यांच्या वेतनामध्ये कपात करण्याचे धाडस राज्याचे मुख्यमंत्री व कामगार मंत्री व आयुक्त यांनी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

‘पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर उभी नसून, ही श्रमिकांच्या तळ हातावर उभी आहे.’ असे गौरव उदगार लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी काढले होते. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या नावानेच स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना केली होती. तसेच कामगारांना घटनात्मक अधिकार मिळवून दिला होता. आज कामगार चळवळ नष्ट झाली असून अनेक कामगार बेरोजगार होत आहे. भांडवालदारांचे हित पाहणारे सरकार व काही अधिकारी यांच्यामुळे कामगारांना गुलामाची वागणूक मिळत आहे. पण कारवाई होत नाही. पाचगणी-वाई रस्त्यावरील पसरणी घाटात तीन किलोमीटर अंतराच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येकांना पुढे जाण्याची घाई होती. परंतू कामगार दिन असून सुद्धा महिला - पुरूष कष्टाचे दिवसभर उन्हात काम करून कामगार दिन साजरा करीत होते, याचा अनेकांना विसर पडला तरी, काही पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. सातारा जिल्हा हा क्रातीकारकांचा जिल्हा आहे. ही ओळख आता पुसून गेली असून कामगार कायद्यालाच राबविण्यात येत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. याबाबत आता चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी लोकजनशक्तीचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष फारुख पटनी यांनी केली आहे.

No comments