Header Ads

सातार्‍यात उन्हाळी बॉक्सिंग शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद satara

सातारा : बॉक्सिंग खेळाचा प्रसार आणि प्रचार हे एकच ध्येय ठेवून सातारा बॉक्सिंग अकॅडमीमार्फत सातारा जिल्हा क्रीडा संकुल येथे उन्हाळी बॉक्सिंग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या बॉक्सिंग शिबीरासाठी सातारा जिल्ह्यासह अहमदनगर, कोल्हापूर याही जिल्ह्यातून खेळाडू सहभागी झाले असून शिबीराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शिबीरात मुलांमधील कौशल्यगुण जाणून घेवून त्यांना स्पर्धात्मक दृष्टीने कमी वेळात खेळाचा जास्त सराव कसा करता येईल, विविध कौशल्य शिकण्यास कशी मदत होईल यावर जास्त भर देण्यात आला आहे. अभ्यासाबरोबरच सरावाच्या वेळेचे नियोजन कसं करावे, तसेच शारिरिक क्षमता आणि आत्मविश्‍वास वाढ यावर प्रशिक्षणात जात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. परिपूर्ण डाएट प्लॅन, सोबत स्पोर्टस सायकॉलॉजी बाबत संपुर्ण मार्गदर्शन करुन प्रशिक्षणार्थींना बॉक्सिंग क्रीडाप्रकारात सर्वगुणसंपन्न बनवण्याचा प्रयत्न या शिबीराच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

गेली ४ वर्षात महाराष्ट्रात सर्वात जास्त २०८ राज्यस्तरीय पदक विजेते खेळाडू, २७ राष्ट्रीय खेळाडू, ४ राष्ट्रीय पदके, २ वेळा सांघिक विजेतेपद आणि २ वेळा सांघिक उपविजेतेपद पटकावण्याची किमया सातारा बॉक्सिंग अकॅडमीने केली आहे. तसेच आयुष मोकाशी, रिषिका होले, यशश्री धनावडे, स्वप्निल साळवी, यासर मुलाणी यासारखे राष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार खेळाडू घडवणार्‍या या अकॅडमीमध्ये एनआयएस, आयबा स्टार यासारख्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांमार्फत तंत्रशुध्द मार्गदर्शन दिले जात आहे. चालू शिबीरात सातारा जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील (१९ वर्षाखालील) कांस्यपदक विजेती श्रुतुजा रहाणे, युथ राज्यस्तरीय स्पर्धेची आणि सीबीएसई राष्ट्रीय स्पर्धेची सुवर्णपदक विजेती कोमल तनपुरे, कोल्हापूर मधील शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील (१९ वर्षाखालील) कांस्यपदक विजेती आलिशा नायकवडी यांच्यासह अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप, सहप्रशिक्षक गोपाल राठोड, विनोद राठोड, फिटनेस ट्रेनर राहूल तोरणे यांचे मार्गशर्दन खेळाडूंना मिळत आहे. या प्रशिक्षण शिबीरासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांचेही मार्गदर्शन लाभत असून प्रशिक्षणातून दर्जेदर खेळाडू घडतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

No comments