Header Ads

साताऱ्यातील अपघातात पत्रकार पांडूरंग पवार यांचे निधन ; एक गंभीर जखमी satara

सातारा : साताऱ्याच्या सदरबझार मधील पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पत्रकार पांडूरंग नामदेव पवार वय-४२, रा. गुरुवार पेठ, मुळ रा. धावडशी, ता.सातारा यांचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान सातारा येथील खासगी रुग्णालयात मृत्यु झाला. या अपघातात राजेंद्र दशरथ गायकवाड वय-४६, रा. दौलतनगर, करंजे हे गंभीर जखमी झाले असून यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातास कारणीभूत असणाऱ्या कारचालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सातारा येथील गुरुवार पेठेत पत्रकार पांडूरंग पवार हे कुटुंबियांसमवेत राहण्यास होते. पवार हे सातारा पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच दैनिक महासत्ताचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. रविवारी रात्री ते राजेंद्र गायकवाड यांच्यासमवेत नागेवाडी ता.सातारा येथून दुचाकीवरुन साताऱ्याकडे परतत होते. दुचाकी राजेंद्र गायकवाड हे चालवत होते. सदरबझार मधील भिक्षेकरी गृहासमोर त्यांच्या दुचाकीला वॅगनआर एम.एच.0३.बी.एच.४१0४ ने जोराची धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीस धडकलेल्या वॅगनआर कारला पाठीमागून आलेल्या इर्टिगा कार एम.एच.११.व्ही.व्ही.७१९३ ने धडक दिली. वॅगनआर कारने दुचाकीस धडक दिल्याने त्यावर असणारे पांडूरंग पवार आणि राजेंद्र गायकवाड हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघाताच्या ठिकाणाजवळून एक रुग्णवाहिका निघाली होती. हा अपघात पाहून त्यात असणाऱ्या डॉ. दिपाली पाटील व चालक तानाजी पाटील रा.मलकापूर, कराड यांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पवार यांच्याकडे असणाऱ्या मोबाईल हँडसेट मधील नंबर मिळवत त्यावरुन त्याठिकाणच्या काहीजणांनी अपघाताची माहिती पवार यांच्या निकटवर्तीयांना दिली. माहिती मिळताच त्यांचे कुटुंबिय, मित्र, पत्रकारीतेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पांडूरंग पवार यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना नंतर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले. उपचार सुरु असताना सोमवारी सकाळी पवार यांचा मृत्यु झाला. त्यांचा मृत्यु झाल्याचे समजताच त्यांच्या मित्रपरिवाराने खासगी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. याप्रकरणी सतीश महादेव सुर्यवंशी रा. दौलतनगर, करंजे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून कारचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पत्रकार पांडुरंग पवार यांचा अपघात झाल्याचे समजताच सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, जीवनधर चव्हाण, शरद काटकर, विनोद कुलकर्णी, अविनाश कदम, अमोल मोहिते, राजू भोसले, प्रवीण पाटील, भालचंद्र निकम, संदीप शिंदे, दीपक दीक्षित, ओंकार कदम, विठ्ठल हेंद्रे, सचिन जाधव, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. पांडूरंग पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी आठ वाजता धावडशी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुमारे २0 वर्षांपुर्वी धावडशी येथून आलेल्या पवार यांनी सातारा येथे पत्रकारितेची सुरुवात केली. त्यांनी आपल्या लिखानातून ग्रामीण भागातील समस्या मांडल्या होत्या. धडपडी, हरहुन्नरी पवार यांनी क्रीडाक्षेत्रात सुध्दा आपला ठसा उमटवला होता. गेल्या सहा वर्षांपासून पवार यांनी सातारा, मुंबई, ठाणे, हैद्राबाद, नवी दिल्ली येथील मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवत पदकांवर आपली मोहोर उमटवली होती. मृत पवार यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, मुलगा ओंकार, मुलगी प्रगती, भाऊ,भावजय असा परिवार आहे.

No comments