Header Ads

यावं…पुस्तकाचं गाव भिलार… तुमची वाटं पाहतयं... !! satara

सातारा : झटपट म्यागीच्या काळ… चार ओळीत संदेशाच्या देवाण घेवाणीचा काळ… एकेकाळी  हजार शब्दांचे संपादकीय साडेतीनशे शब्दात बसवण्याचा काळ… लोकांच्या अभिरुचीच्या संक्रमणाचा काळ… प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करुन आनंद घेण्याचा काळ… अशा काळात महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन जगप्रसिद्ध थंड हेवच्या ठिकाणाच्या मधोमध स्ट्रोबेरीच आगार अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतीम सौंदर्याने नटलेल्या… सह्याद्रीच्या रांगानी खास या गावासाठीच जणू जागा सोडली असावी अस वाटणार भिलार गाव… दोन वर्षापूर्वी पुस्तकाच गाव झालं…. त्याला उद्य दि.4 मे रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत… या दोन वर्षात या गावाने कात टाकली… मराठी साहित्याला सोनेरी झळाळी देणारा हा प्रकल्प हां… हां… म्हणता देशभर गाजला… रोजचे पर्यटक तर येतातच पण आजपर्यंत पाचशे शालेय सहली इथे आल्या… एका सहलीला सरासरी 250 विद्यार्थी धरले तर 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या गावाने मोहून टाकले… काहींना सहज चाळता चाळता त्या पुस्तकाची गोडी लागली… काहींना आयुष्यातील एक सुंदर सेल्फी पुस्तकाच्या गावातल्या बोर्डाबरोबर, चित्रांबरोबर काढून आयुष्याच्या पटावरच सुंदर चित्र म्हणून मनावर कोरुन ठेवलं… स्ट्रॉबेरीची गोडी आणि प्रत्येक पुस्तकाच्या घरात जावून फोटो काढण्याचा मोह… यातून भिलार गावाच व्याप वाढला… काही महिन्यापूर्वी आम्ही ज्या प्रतिक्रीया घेतल्या त्या वाचल्यास अधिक बोलक्या वाटतील… पुस्तकाच भारतातल पहिल गाव महाराष्ट्राबाहेरच्या लोकांनाही भुरळ घालत आहे. तुम्ही अजून गेला नसाल तर नक्की जा.

दगदगीच्या आयुष्यातून आनंदासाठी काही क्षण हल्ली माणूस वेचतो… त्यातला आनंद पुस्तकाच्या गावात पुस्तकाच्या पानासोबत शेअर करा… आयुष्यातली संस्मरणीय इव्हेंट म्हणून भिलार भेट नेहमीच काळजात कोरुन राहील… अशा भिलार विषयी दोन वर्ष पूर्तीनिमित्त घेतलेला हा आढावा खास तुमच्यासाठी… भिलार या  गावात 4 मे 2017  या दिवसापासून महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने अनोख पुस्तकाच गाव भिलार साकारण्यात आलं ... आज या पुस्तकाच्या गावामध्ये 25 घरांमध्ये वेगवेगळया साहित्य प्रकाराची  पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन चळवळ वाढावी, येणाऱ्या पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य आणि इतिहास  याचे प्रत्येक घरात वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची दालन उभी केली आहेत. निवडलेल्या 25 घरांवर विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली आहेत.  चित्राच्या संगतीनुसार त्या घरात वाचकाला साहित्य उपलब्ध होते. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या घरामध्ये संतवाड;मय व अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होते. अशा प्रकारे केवळ चित्रांवरुन पर्यटकाला त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे, याची माहिती मिळते.केवळ एक सरकारी वाचनालय उभारण्यापेक्षा या प्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यात आले आहे. पंचवीस घरात वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्याच्या आवडीप्रमाणे वाचन करता येते. जवळपास  पंधरा हजार मराठी पुस्तके या गावात ठेवण्यात आली आहेत. आणि त्यात दिवसेंदिवस भर पडते आहे.

प्रकल्पासाठी निवडलेल्या घरांची व ठिकाणांची नावे :हिलरेंज हायस्कूल-बालसाहित्य, बाळासाहेब भिलारे- कादंबरी, अनमोल्स ईन, राहूल भिलारे- महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा व संस्कृती, शिवसागर, सुभाष भिलारे- विज्ञान, श्री हनुमान मंदिर-नियतकालिके व साहित्यिक माहिती फलक (प्रदर्शन), साई व्हॅली पॅलेस, विजय भिलारे- इतिहास, साई, मंदा भिलारे क्रीडा व विविध लोकप्रिय, गणपत भिलारे- दिवाळी अंक, कृषी कांचन, शशिकांत भिलारे-चरित्रे व आत्मचरित्रे, बोलकी पुस्तके, विशाल भिलारे- वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मंगलतारा, प्रशांत भिलारे- छत्रपती शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले, दत्तात्रय भिलारे- परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास, प्रवीण भिलारे-कथा, अनिल भिलारे-स्त्री साहित्य, नारायण वाडकर- लोकसाहित्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-बालसाहित्य, सुहास काळे-ललित गद्य व वैचारिक, श्रीराम मंदिर साहित्यिक (प्रदर्शन) आणि भाषीक व साहित्यिक खेळ, संतोष सावंत- विनोदी, जिव्हाळा, आकाश भिलारे-विविध लोकप्रिय व पुरस्कार विजेते, गणपत पारठे-विविध कलांविषयक, मयूर रिसॉर्ट, अजय मोरे-निसर्ग, पर्यटन आणि पर्यावरण, श्री जननीमाता मंदिर, संत साहित्य, श्री जननीमाता मंदिर (श्री गणपती मंदिरा जवळ)- साहित्यिक माहितीफलक (प्रदर्शन) आणि गिरीजा रिसॉर्ट- कविता.

पुस्तकाचं गावं नेमक आहे तरी कसं…!

§ 25 घरात 15 हजार पुस्तकांचा खजिना.
§ पर्यटकांच्या आवडीनुसार वाचनासाठी साहित्य उपलब्ध.
§ चित्रांच्या संगतीनुसार पुस्तकांची मांडणी.
§ गावात कथाकथन अन् कविता वाचनाचे आयोजन.
§ पर्यटकांच्या भेटीला नामवंत लेखक-प्रकाशक.
§ अंधांसाठी इ-बुकची उपलब्धता.
§ पर्यटकांच्या साक्षीने नव्या कादंबऱ्यांचे प्रकाशन सोहळे.

शैलेंद्र तिवारी, पर्यटक, मुंबई : देशात पुस्तकाचं गाव होण्याचा बहुमान भिलारला मिळाला हे मला समजलं. मी येथे आलो अनेक घरांना भेटी देवून पुस्तके वाचली. पर्यटकांनी जास्तीत जास्त या गावाला भेट देवून पुस्तक वाचनाचा आनंद घ्यावा. 

सुप्रिया रांजणे, पयर्टक, सातारा : मी भिलार या गावाला भेट देण्यासाठी सातारहून आली आहे. शासनाने राबविलेला हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. येथे आल्यानंतर चांगल्या पद्धतीची पुस्तके वाचयला मिळाली. मोबाईल, टीव्हीच्या विश्वात  हा एक चांगला उपक्रम आहे. पुढच्या वेळेस कुटुंबासह या गावाला भेट देईन.

हेमलता वाघ, पर्यटक, इंदोर, मध्य प्रदेश : शासनाने हा राबविलेला उपक्रम छान आहे. येथे वेगवेगळे पुस्तके वाचून मला आनंद मिळत आहे. या गावामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पर्यटक येत आहेत, मी शासनाची आभारी आहे.

अश्विनी, मुंबई पर्यटक: मी पर्यटनासाठी विविध ठिकाणी गेले, असे पुस्तकावे गाव कुठेही पाहिले नाही. येथील पुस्तके पाहुन वेगळाच आनंद झाला. शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आणि आगळा वेगळा आहे.

स्वाती बर्गे, शिक्षक, हिलरेंज हायस्कूल, भिलार : भिलार हे पुस्तकाचं गाव झाल्यापासून या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक   तसेच शैक्षणिक सहलीही येत आहेत. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मुलांना खुप पुस्तके वाचायला मिळत आहे.त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. 

यश धनवडे, विद्यार्थी : रेग्युलर अभ्यासाव्यतिरिक्त मला येथे कथा, बाल साहित्य, इतिहास असे अनेक पुस्तके वाचायला मिळाली. या वाचनातून मला शिकायला मिळाले. शासनाने येथे चांगली पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत. 

राहूल भिलारे, हॉटेल व्यावसायीक : माझ्या हॉटेलमध्ये महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा व संस्कृती विषयक पुस्तके ठेवण्यात आली आहेत. भिलार पुस्तकाच गाव झाल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. या गावाचे परिवर्तन झाले. स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आता पुस्तकाचं गाव म्हणून नावा रुपाला येत आहेत. गावात 25 ठिकाणी विविध प्रकारची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. पर्यटक येतात पुस्तके वाचून जातात याचा आनंद वाटतो. हे गाव जगाच्या नकाशावर आले. पर्यटनाला चालना मिळेल व भविष्यात याचा फायदा होईल.

शशिकांत भिलारे ग्रामस्थ : माझ्या घरात चरित्र आणि आत्मचिरत्र या विषयांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या पुस्तकाच्या गावातील मी एक घटक आहे. दर आठवड्याला 300 ते 400 पर्यटकांबरोबर शैक्षणिक सहलीही या गावाला भेट देत आहेत. आत्तापर्यंत 20 हजार पर्यटकांनी या पुस्तकाच्या गावात येवून पुस्तक वाचणाचा आनंद घेतला आहे.

सरस्वती भिलारे : माझ्या घरामध्ये शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले या विषांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत. आमच्याकडे भरपूर पर्यटक येतात. बरेच पुस्तके वाचतात.

भिकु भिलारे : माझ्या घरामध्ये परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास या विषयावर पुस्तके ठेवण्यात आली आहेत. आमच्या गावामध्ये ज्ञानाची गंगा आली आहे. गावामध्ये पुस्तक प्रेमी, पीएचडी करणारे विद्यार्थी येत आहेत. त्यांना दुर्मिळ पुस्तके वाचायला मिळत आहेत. आमच गाव पुस्तकाचं गाव झालं याचा अभिमान वाटतो.

प्रविण भिलारे : माझ्या घरामध्ये कथा साहित्य ठेवण्यात आले आहे. शनिशिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत  तसेच माझ्या घरालाही दरवाजा नाही. पुस्तक वाचण्यासाठी माझे घर पर्यटकांसाठी 24 तास खुले केले आहे. या गावाची स्ट्रोबेरी बरोबर पुस्तकाच गाव अशी ओळख निर्माण झाली आहे. कृपया वाचकांनी गरजेनुसार पंखा व दिव्यांचा वापर करावा हे घर आपलेच आहे, अशा प्रकारची सूचनाही माझ्या घरात लिहली आहे.

पुस्तकं आयुष्याला वळण देतात…. अनुभव, विचार, ज्ञान बळकट करतात…. पुस्तकाची गोडी लागण्यासाठी पुस्तकांचा सहवासही महत्वाचा असतो त्यासाठी पुस्तकाचं गाव भिलार हा एक अभिनव उपक्रम आहे  आणि गावकऱ्यांचा सहभाग याचं उत्तम उदाहरण असणार पुस्तकाचं गाव भिलार हा अभिवन उपक्रम आहे. 


                                                                                                                   युवराज पाटील
                                                                                                       जिल्हा माहिती अधिकारी, सातारा.

No comments