Header Ads

कोयना धरणातील पाणीसाठा मे अखेर संपणार ! ; कोयना धरणात केवळ ३१.०५ टीएमसी पाणीसाठा patan

पाटण : तीव्र दुष्काळामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या पाणी मागणीचा भार सतत कोयना धरणातील पाणीसाठ्यावर वाढत चालला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत कोयना धरणातील पाणी पायथा वीजगृह आणि नदी विमांचकद्वारे सांगलीकडे सोडणे सुरू आहे. आजअखेर कोयना धरणात केवळ ३१.०५ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असून, कोयना धरणातील पाणीसाठ्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही. त्यामुळे मे अखेर कोयनेतील पाणीसाठा संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. असे झाले तर जूनच्या पहिल्या पंधरा दिवसांचे नियोजन काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. मात्र, वीजनिर्मितीचा वाढता आलेख आणि कर्नाटक, सांगलीकडील पाणीटंचाईचे दुर्भिक्ष यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा एप्रिल आणि मे महिन्यात अत्यंत झपाट्याने खालावला आहे. सध्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक आणि नदी विमांचकमधून १००० क्युसेक पाणी धरणातून नदीपात्रात सोडणे निरंतर सुरू आहे. यापुढे पाऊस सुरू होईपर्यंत कोयना धरणातील पाणी सांगलीकडे सोडणे बंद होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता मे महिन्याचे उरलेले १९ दिवस आणि शिल्लक पाणीसाठा ३१ टीएमसी हे गणित वीजनिर्मिती आणि पूर्वेकडील सिंचनासाठी होणारा पाणीवापर पाहता जुळेल की नाही, याची शाश्वती नाही. जरी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाला नाही तर मात्र, कोयना धरणात खडखडाट होऊन राज्याची पाणीबाणी अधिकच बिकट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आहे. तत्पूर्वी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना धरणातील पाणी राज्याबाहेर देऊ नये, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र आजअखेर तरी त्यांच्या मागणीचा प्रभाव लागू झालेला दिसत नाही.

No comments