Header Ads

पत्रकारावरील हलेखोरांना तात्काळ अटक करा satara

खंडाळा : शिरवळ येथे पत्रकार मुराद पटेल यांच्यावर गुरुवारी रात्री अज्ञात 5 ते 6 जणांनी धारदार शस्त्राने प्राणघात हल्ला करुन गंभीर जखमी केले असून पटेल यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. याप्रकरणी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ, खंडाळा तालुका पत्रकार संघाने एकजुट दाखवत पोलिस यंत्रणा तपासासाठी गतीमान केली. हल्ल्याचा सर्वंकश तपास करुन जे हल्लेखोर आहेत त्या संशयित आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी एकमुखी मागणी शिरवळ पोलिसांकडे करण्यात आली. दरम्यान, जिल्हा पोलिसप्रमुख तेजस्वी सातपुते यांनी या घटनेचा लवकरच छडा लागला जाईल अशी ग्वाही दिली.

शिरवळ येथील खासगी रुग्णालयात मुराद पटेल यांच्यावर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी सकाळी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दिपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, परिषद प्रतिनिधी सुजित आंबेकर, राहूल तपासे, खंडाळा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी मुराद पटेल यांची भेट घेवून प्रकृतीची विचारपूस केली.त्यानंतर जिल्ह्यातील पत्रकारांनी उपचार करणार्‍या डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडूनही अधिक माहिती घेतली.

यानंतर सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ व खंडाळा पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी शिरवळ पोलिस ठाण्याचे पोनि विनायक वेताळ यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे यांच्यासह मान्यवरांनी पत्रकारावरील हल्ल्याबाबत जाहीर निषेध व्यक्त केला. हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी. हल्लेखोरांचा शोध घेवून त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई करावी. यामुळे भविष्यात अशाप्रकारचे हल्ले पत्रकार व सर्वसामान्यांवर होणार नाहीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विनोद कुलकर्णी, शरद काटकर, दिपक प्रभावळकर यांनीही मनोगत व्यक्त करुन घटनेचा निषेध व्यक्त केला.

पोनि वेताळ म्हणाले, हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. जखमीवर उपचार सुरु असून उपचारानंतर पुन्हा एकदा पोलिस जखमीशी संवाद साधून हल्ल्याची व संशयितांची नेमकी माहिती घेईल. यासाठी पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आहेे. लवकर याप्रकरणातील हल्लेखोर अटक केले जातील अशी ग्वाही पोनि विनायक वेताळ यांनी दिली. यावेळी खंडाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पवार, उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, सचिव संजय भरगुडे, पत्रकार शशिकांत जाधव, राहुल तपासे, निलेश गायकवाड, विठ्ठल हेंद्रे उपस्थित होते.

दरम्यान, मुराद पटेल यांच्यावर गुरुवारी रात्री मुराद पटेल हा एकटा असताना अज्ञात हल्लेखोरांना त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या घटनेत त्यांच्यावर सुमारे 6 वर्मी घाव बसले आहेेत. डोके, हात, पाठ व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क साधला. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. शुक्रवारी दिवसभर विविध स्तरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त होत होता.

No comments