Header Ads

सातार्‍याची लढाई राजा विरुद्ध प्रजा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस satara

सातारा : माढ्यात आज आम्ही विशाल जनसागर पंतप्रधानांच्या सभेत पाहिला आहे, त्यामुळे आम्हाला विश्‍वास आहे की, माढा काय अन् बारामती काय, आम्ही सातारा सुद्धा जिंकणारच. सातार्‍यातील लढाई ही राजा विरुद्ध प्रजा अशीच आहे. राजांबद्दल मी काही बोलणार नाही, कारण सगळ्यांना सगळे माहीत आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीमुळे सातारा जिल्ह्यावर दुष्काळाचा कलंक लागला आहे. हा कलंक आम्ही पुसणार आहोत. सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून नरेंद्र पाटील हेच खासदार होणार आहेत,  असा विश्‍वास मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजसमोरील मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील, पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर,  विक्रम पावस्कर, मदनदादा भोसले, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष महेश शिंदे, मनोज घोरपडे, अशोक गायकवाड, संतोष जाधव, राहुल बर्गे यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.

ना. फडवणीस पुढे म्हणाले, शरद पवार यांनी अगोदर माढ्यातून लढण्याची जोरदार तयारी केली होती. स्वतःची उमेदवारी जाहीर करुन ते स्वतः फिरले. मात्र, हवेची दिशा कळल्यानंतर त्यांनी माघार घेतली. ओपनिंग बॅट्समन म्हणून जाणार्‍या पवारांनी राखीव 12 वा खेळाडू म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला, याचाच अर्थ राज्यात सर्वत्र महायुतीला चांगले वातावरण असून, आजच्या माढ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मोठा जनसमुदाय लोटला होता. त्यामुळे माढा, बारामती आणि सातारा आम्ही जिंकणार आहोत, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्ह्याला दुष्काळाचा कलंक लावण्याचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 50 वर्षांत केले असून, जिल्ह्याचे पाणी इतर जिल्ह्याला देताना शांत बसण्याचे महापाप केले. पाणीदार जिल्हा असताना सुध्दा जिल्ह्यातील पाणी प्रश्‍न सुटू शकलेला नव्हता. युती सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातारा जिल्ह्याची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून सुमारे चार हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करत असताना केंद्रीय जल आयोगाची मान्यता देखील या प्रकल्पांना दिली आहे. आजच कोरेगाव तालुक्यात कठापूरमध्ये गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना प्रकल्पातील बंधार्‍याचा शेवटचा स्लॅब टाकण्यात आला आहे, ही माहिती महेशदादा शिंदे यांनी आताच दिली आहे. आम्ही प्रामाणिकपणे पाणी योजना पूर्ण करत असून, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच पाणी योजनांना निधी देण्याचे काम केले आहे. सातारा उरमोडी, वसना-वांगणासह धोम बलकवडी योजनांची कामे मार्गी लावली आहेत. नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते आण्णासाहेब पाटील यांचे वारसदार असून, अत्यंत प्रामाणिक  नेते आहेत. त्यांनी माथाडी कामगारांसाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. त्यांना अनेकांनी प्रलोभने दाखवली. मात्र त्यांनी माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी मोठा त्याग केला आहे. 24 तास जनतेसाठी उपलब्ध असणारा आणि संघर्ष करणारा हा नेता असून, तोच आता जिल्हा पाणीदार करु शकतो, त्यामुळे जनतेचे त्याला आशीर्वाद असून, ते वाया जाणार नाहीत. 

नरेंद्र पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टिका करताना सांगितले की, सातार्‍याच्या खासदारांनी दहा वर्षांत कसलेही ठोस काम केले नाही. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही, केंद्र आणि राज्य सरकारनी केलेली कामे स्वतःच्या नावावर खपवण्यात धन्यता मानल्याचे सांगितले. सातारा जिल्ह्यात जास्त धरणे असताना देखील, अनेक तालुके पाण्यावाचून उपाशी आहेत, याबद्दल वाईट वाटते. जिल्ह्याचे पाणी इतर जिल्ह्याला दिले जात असताना, खासदार महोदय शांत बसले, त्यांना सामान्य जनतेबद्दल काही देणेघेणे नाही, असेही ते म्हणाले.

शालिनीताई पाटील यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, त्यांची चूक काय झाली, त्यांनी आरक्षणाच्या भूमिकेवर राज्यव्यापी दौरा केला, मात्र त्यांचाच काटा काढण्यात आला. अहो त्यांचा काटा कोणी काढला, हे सामान्य जनतेला माहीत आहे. त्यासाठी त्यांनी जावलीचा गडी आणला, त्यांनी येताना माथाडी कामगार बरोबर आणले. त्यांनी दहा वर्षांत काही केले नाही, पाण्याचे काम केले नाही, पाणी योजना करु शकले नाहीत, मंत्रिपद असताना कामे केली नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्था बंद पाडण्याचे एकमेव काम केले. कोरेगाव तालुक्याचा दुष्काळ ते हटवू शकले नाहीत. त्यांना जनता काय करु शकते, हे आता दाखवूनच देणार असून, लोकसभा निवडणुकीनंतर कोरेगावातच मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा दिला. शालिनीताई पाटील यांनी कष्टातून उभारलेल्या जरंडेश्‍वर साखर कारखाना स्वस्तात लाटणार्‍याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि कारखान्याच्या शेतकरी-सभासदांना न्याय द्यावा, असे ते म्हणाले.

महेश शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आता उरमोडी, धोमच्या पाण्याकडे लक्ष घालावे आणि  गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणावे, अशी विनंती केली. प्रचंड पाण्याचा सातारा जिल्हा असताना दुष्काळाचा कलंक काँग्रेस-राष्ट्रवादीने लावला आहे. दोन्ही काँग्रेसला पाणी प्रश्‍न निट समजला नाही. खासदारांना दहा वर्षांत दुष्काळ मिटवता आला नाही की जनतेकडे जाता आले नाही. कोरेगावचे आमदार हे मासिक आमदार असून, केवळ पर्यटनासाठी येथे येतात, अशी टीका त्यांनी केली. महावितरण कंपनीचे कार्यालय सातार्‍यातून बारामतीला हलविले असून, साध्या कामासाठी शेतकर्‍याना आता बारामतीच्या फेर्‍या कराव्या लागत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून महेश शिंदेंची दखल...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणात युवा नेते महेश शिंदे यांचा अनेकदा नामोल्लेख केला. ते म्हणाले, महेश शिंदे यांनी मला इथल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. पाणी असूनही आजवरच्या राज्यकर्त्यांना त्याचे नियोजन करता आलेले नाही. आम्ही जिहे - कठापूर, उरमोडीसाठी निधी दिला. महेशदादांनी मला आत्ताच सांगितले जिहे-कठापूरचा शेवटचा स्लॅब आजच पडला ही चांगली खुषखबर आहे. तुम्ही माझ्या नरेंद्रला निवडून द्या. मी जिहे - कठापूर योजनेचे पाणी पूजन पंतप्रधानांच्या हस्ते करुन दाखवेन, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

No comments