Header Ads

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करा : विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर satara

सातारा : १७ व्या लोकसभा निवडणूकीची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी १० मार्चला केली आणि निवडणूकांची रणधुमाळी सुरु झाली. पुणे विभागातील लोकसभा मतदार संघाचं मतदान १८, २३ आणि २९ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणूका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने पुणे विभागाच्या तयारीबाबत विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी निरीक्षक तथा दिव्यांग मतदारांसाठीचे ॲक्सेसिबिलिटी ऑब्झर्व्हर डॉ. दिपक म्हैसेकर यांची वृषाली पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत....!

निवडणूक विषयक कामाचं नियोजन- पुणे विभागात निवडणूकीच्या कामकाजासाठी विविध विभागातील 1 लाख 81 हजार हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले असून विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत.  विविध कक्षांमार्फत निवडणूकीचे काम नियोजनबध्द पार पाडले जात आहे.

मतदाराकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर-- 1) पासपोर्ट, 2) वाहन चालक परवाना 3) केंद्र/ राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचा-यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र 4)बँक/पोस्ट ऑफिसद्वारे जारी केलेल्या फोटोसह पासबुक 5) पॅन कार्ड 6) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड 7) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) जॉब कार्ड 8) श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड 9)फोटोसह पेंशन दस्तऐवज 10) खासदारांना / आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र  11) आधार कार्ड..  यांपैकी कोणतेही कागदपत्र अथवा ओळखपत्र मतदानासाठी निवडणूक ओळखपत्र नसेल तर ग्राहय धरले जाईल.

मतदारांसाठी सुविधा- सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विविध प्रकारच्या मुलभूत सुविधा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरीक, अपंग आणि अंध व्यक्तींसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या माहितीचे फलक लावण्यात येणार आहेत. तसेच ट्रु व्होटर ॲपही उपलब्ध करुन दिला आहे. मतदान केंद्र स्थळी मतदारांना माहिती देण्यासाठी मदत कक्ष उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता गृह, विजेची सोय तसेच तसेच अन्य आवश्यक सुविधा देवून आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात येत आहेत.

दिव्यांग मतदारांसाठी उपाययोजना- कोणत्याही प्रकारचा मतदार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहता कामा नये यासाठी दिव्यांग मतदार जागृती करण्यात येत आहे.  भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तिंचा मतदान प्रक्रीयेत सहभाग वाढवण्यासाठी पीडब्लूडी  ॲप (PWD App) तयार केले आहे. या प्रक्रीयेत सहभागी होण्यासाठी काही मदतीची आवश्यकता असल्यास दिव्यांग व्यक्ति पीडब्लूडी ॲप मोबाईल वर डाऊन लोड करुन या ॲपव्दारे ते मदतीचे स्वरुप नोंदवू शकतात. तसेच 1950 किंवा 1800111950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. त्यानंतर त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्हिलचेअर अथवा वाहनाची सोय करुन देण्यात येईल. दिव्यांगांची मतदार नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हिल चेअरची मागणी आदि. सोयींसाठी निवडणूक आयोगाने हा ॲप उपलब्ध करुन दिला आहे.

आचारसंहितेच्या तक्रारीबाबत-- निवडणूक कालावधीत आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत "सी-व्हिजिल" हा मोबाईल ॲप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केला आहे. निवडणूकी दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार नागरिक या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन दाखल करू शकतील. या तक्रारीवर अवघ्या 100 मिनीटात कार्यवाही होणार आहे. नागरिक NGRSव्दारे ही तक्रार दाखल करु शकतात. सैन्यदलातील तसेच निवडणूक विषयक कामात असणाऱ्या मतदारांना मतदान करता यावे, यासाठी सुविधा--  सैन्यातील सर्व्हिस वोटर्स साठी ईटीपीबीएस म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स्मीटेड पोस्टल बॅलेट सर्व्हीस ही प्रणाली यावेळी नव्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर निवडणूक विषयक कामकाजात असणा-या मतदारांना मतदान करण्यासाठी  Election Duty Certificate (EDC) किंवा Postal Ballot (PB)  सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

अधिकाधिक मतदारांनी मतदान करावं, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न--  विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत महाविद्यालये आणि सार्वजनिक मोक्याच्या ठिकाणी मेळावे तसेच पथनाट्ये, विविध स्पर्धा तसेच जाहिरातींव्दारे मतदान करण्याबाबत संदेश देण्यात येत आहे. याबरोबरच गावांमध्ये मतदाना दिवशी आठवडे बाजार असल्यास तो बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी नोकरदारवर्गांना मतदान करण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे.

मतदारांना संदेश- राज्यघटनेने आपल्याला मतदान हा सर्वात मौल्यवान हक्क दिला आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावायलाच हवा. मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या सद्सदविवेक बुद्धीने मतदान करायला हवं...!
                             
                                                       
                                                                                        --शब्दांकन- वृषाली मिलिंद पाटील,
                                                                                            विभागीय माहिती कार्यालय, पुणे

No comments