Header Ads

भारतरत्न डॉ.आंबेडकरांना अभिवादन करून श्री.छ.उदयनराजेंनी प्रसिध्द केला निर्धारनामा satara

सातारा : महामानव, घटनाकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा शहरातील पुतळ्याला १२८ व्या जयंती निमित्त श्री.छ.उदयनराजेंनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण, पंचशील वंदना घेण्यात आली. त्याचठिकाणी लोकसभा निवडणुकीचा निर्धारनामा महाआघाडीचे उमेदवार श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्ध केला. यावेळी डॉ.आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराचे रान उठले आहे. अनेक उमेदवार, राजकीय पक्ष मतदारांना आपली भूमिका सांगण्यासाठी जाहीरनामा, वचननामा, निर्धारनामा विविध ठिकाणी जाऊन प्रसिद्ध करत आहेत. परंतु, छत्रपती शिवरायांचे थेट १३ वे वंशज श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी घटनाकार डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निर्धारनामा प्रसिद्ध करून ऐतिहासिक घटना घडवली आहे. यावेळी त्यांच्या समवेत श्री.छ.सौ.दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्षा सौ.माधवी कदम, संदीप शिंदे, प्रवीण धस्के, सनी भोसले, राम हादगे, अशोक सावंत, प्रताप शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय निधीतून कामाचा लेखाजोखा, संकल्प व पुढील विकास कामांचा निर्धारनामा या दोन पानी कागदावर थोडक्यात  मांडण्यात आला आहे. श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या पायाला दुखापतीमुळे वेदना होत असतानाही त्यांनी डॉ.आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिडी चढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या समवेत अनेक मागासवर्गीय, दलित समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच श्री.छ.भोसले यांनी निर्धारनामा प्रसिद्ध करून समतेचा संदेश दिला आहे. तो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत आवश्यक आहे अशी भावना निर्माण करण्यात आली आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा रद्द करावा अशी जाहीर मागणी यापूर्वी श्री.छ.भोसले यांनी केली होती. त्यामुळे अनुसूचित जाती-जमातीतील सुशिक्षित वर्गाने तीव्र विरोध केला होता. पण, घटनाकारांच्या पुतळ्याला अभिवादन करून श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी डॉ.आंबेडकर त्यांच्या पुतळ्याच्या साक्षीने निर्धारनामा प्रसिद्ध केला हे त्यांचे मत परिवर्तन घडवून आणले आहे अशी प्रतिक्रिया आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिली.

No comments