Header Ads

अरुण ठाकूर, किशोर तपासे, वाघमारे गुरुजी यांना साताऱ्यात श्रध्दांजली satara

सातारा : परिवर्तनवादी चळवळीतील पंचेचाळीस वर्षांचा एकत्र प्रवास संपला. परिवर्तनाच्या चळवळीतील एक निरागस आणि उमदे व्यक्तिमत्त्व. इतिहास शिकवावा तर अरुण ठाकूर यानेच अशी त्याची हातोटी होती अशा शब्दात जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी सातारा येथे साथी अरुण ठाकूर यांना श्रध्दांजली वाहीली. नाशिक येथील जेष्ठ विचारवंत अरुण ठाकूर, सातारा येथील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे किशोर तपासे, दलित मित्र गो.मा.वाघमारे गुरुजी यांना सातारकर नागरिकांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यासाठी सातारा येथील श्री.छ. थोरले प्रतापसिंह महाराज नगरवाचनालयाच्या पाठक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती.

वर्तमानातल्या सामाजिक राजकीय घडामोडींचे आकलन आणि इतिहासाचा अभ्यास याची संगती लावण्याचे कसब अरुण ठाकूर याच्याकडे होते असे मानसोपचार तज्ञ डॉ राजश्री देशपांडे म्हणाल्या. मातृभाषेतून शिक्षणासाठी आग्रही असलेल्या स्वतःची प्रकृती साथ देत नसतानाही मराठी शाळा वाचवण्यासाठी आमरण उपोषण अरुण ठाकूर यांनी केल्याचे सांगून मिनाज सय्यद म्हणाले की म गांधींच्या विचारांचा प्रभाव , गांधीजींच्या विचारांची कालसुसंगत मांडणी अरुण ठाकूर यांनी केली होती. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाने समाजपरिवर्तनाच्या चळवळीला अरुण ठाकूर व किशोर तपासे हे कार्यकर्ते दिल्याचे सांगुन चळवळी, आंदोलने यातील त्यांच्या सहभागाच्या अनेक घटनांचा उहापोह विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व पत्रकार विजय मांडके यांनी केला. यावेळी विमा कामगार संघटनेचे नेते कॉ.वसंतराव नलावडे, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अधिकारी सुदर्शन इंगळे, रखमा हेमा श्रीकांत, दिलीप ससाणे, प्रकाश खटावकर, सातारा जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे माजी सभापती  बाळासाहेब शिरसाट, माजी नगरसेवक अमर गायकवाड यांनी यावेळी आदरांजली वाहणाऱ्या भावना व्यक्त केल्या. यावेळी डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर, अरुण गोडबोले, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, दिनकर झिंब्रे, दिलीप भोसले, प्रा.सुनील गायकवाड, जी.ए.जाधव, युवराज जाधव, महेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संभाजीराव नलावडे, हाजी निजाम काझी यांनाही श्रध्दांजली वाहिली.

No comments