Header Ads

भारतीय लोकशाही वाचवणे ही आपली जबाबदारी : श्रीमंत कोकाटे satara

सातारा : सध्या देशात लोकशाही, संविधान धोक्यात आहे. न्यायव्यवस्था, सीबीआय, आरबीआयसारख्या स्वायत्त संस्थांच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे लोकशाही वाचवणे आपली जबाबदारी आहे. अशा स्थितीत गट तट, जात धर्म, पक्ष - संघटना असे भेद बाजूला ठेवून महायुतीला पराभूत करा व लोकशाही वाचवा, असे आवाहन इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केले. सातारा येथे  झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोदी सरकारच्या काळात चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन न्याय व्यवस्थेवर अतिक्रमण होत असल्याची तक्रार केली होती. सीबीआयच्या संचालकांची मध्यरात्री दीड वाजता बदली करून स्वायत्ततेवर घाला घातला गेला. आरबीआयच्या अधिकारात अतिक्रमण करून नोटाबंदी जाहीर केली गेली. ही लोकशाही धोक्यात असल्याची व घटनात्मक संस्थांची स्वायत्तता धोक्यात आल्याचीच लक्षणे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोदींनी जगातील प्रवासासाठी 2 हजार कोटी खर्च केले पण देशात एक रुपयाचीही परकीय गुंतवणूक आली नाही कारण देशात सहिष्णुता राहिलेली नाही. गेल्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. देशाचा विकास खुंटला आहे. लघुउद्योग बंद पडले आहेत. परदेशातील शेतीमाल आयात करून देशातील शेतकर्‍यांच्या शेतीमालाचे भाव या सरकारने पाडले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या श्रमाला आणि शेतीमालाला भाव राहिला नाही. 526 कोटी रुपयांचे राफेल विमान 1670 कोटी रुपयांना खरेदी केले. हा मोदी सरकारने केलेला मोठा भ्रष्टाचार  आहे, अशी टीका त्यांनी केली. मोदी सरकारमधील मंत्री अनंतकुमार हेगडे हे संविधान बदलण्याची भाषा बोलतात. दिल्लीत संविधान जाळणार्‍यावर सरकारने अद्याप कारवाई केलेली नाही. एकीकडे मेक इन इंडियाची भाषा बोलायची व दुसरीकडे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम चीनला द्यायचे हाच यांचा राष्ट्रवाद आहे का?  अजूनही जनता गप्प बसली, तर संविधानाचे राज्य संपेल, देशात हुकूमशाही येईल, स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग करून मिळवलेले स्वातंत्र्य धोक्यात येईल, अशी भीती कोकाटे यांनी व्यक्त केली.

No comments