Header Ads

शेखर गोरेंची राष्ट्रवादीला सोडचिट्टी satara

सातारा : शेखर गोरे यांनी फलटण येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आपल्यावर झालेल्या अन्यायाची खदखद व्यक्‍त करताना राडा केला होता. त्यानंतर पक्षाच्या विरोधात त्यांनी जोरदार रणशिंग फुंकले होते. रविवारी मात्र सातार्‍यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला बाहेरून पाठिंबा देणार आहे. माणमध्ये राष्ट्रवादीला थोपवून भाजपला मताधिक्य मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी अनुभवले ते इतर युवकांच्या वाट्याला येऊ नये. त्यामुळे राष्ट्रवादीत येणार्‍या युवकांनी विचार करावा. राजकारणात जुन्यांना नवे लोक चालत नाहीत.  माण तालुक्यात सदाशिव पोळ यांना पूर्वी मदत केली. त्यानंतर वेगवेगळ्या निवडणुकीत त्यांना सहकार्य करत असताना विरोधकांनी माझ्यावर केसेस दाखल केल्या. विजयसिंह मोहिते पाटील लोकसभेला उभे राहिले त्यावेळीही गुन्हे दाखल झाले. पंचायत समिती, नगरपालिका,  मार्केट कमिटी, सोसायट्या अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये माझ्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवले. शरद पवार यांनी दिलेले नेतृत्व सिध्द करुन दाखवलं. मध्यंतरी मोक्‍कांतर्गत केस माझ्यावर जाणूनबुजून लावली गेली. दुष्काळी जनतेपासून मला दूर ठेवून माणमध्ये नवे नेतृत्व निर्माण करण्याचे काम जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी केले. त्यातून हा संघर्ष घडत गेला. राष्ट्रवादी पक्षासाठी माझ्यावर 7-8 केसेस आहेत. सर्वसामान्यांचा माझ्यावर विश्‍वास असल्यामुळे जास्तीत जास्त केसेस माझ्यावर दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेखर गोरे पुढे म्हणाले, विधानपरिषदेला पराभव झाला त्यावेळी राष्ट्रवादी सोडण्याचं ठरवलं होतं. पण काही नेत्यांनी विनंती केली. त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढवली. म्हसवड नगरपालिकेत संपूर्ण सत्‍ता मिळवली. मध्यंतरी वरिष्ठ नेत्यांना 22 मुद्दे घेवून भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी भेट न दिल्याने चर्चा होवू शकली नाही. फलटणमधील संवाद मेळाव्यात पोलिसांनी कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर रामराजेंसोबत दोन-तीन तास चर्चा झाली. माणमध्ये राष्ट्रवादीत पूर्ण अंधार आहे. या पक्षाचा माणमध्ये आमदार होवू द्यायचा नाही ही  काहीजणांची खेळी असल्याचेही शेखर गोरे यांनी सांगितले.

भाजपला बाहेरुन पाठिंबा का? असे विचारले असता शेखर गोरे म्हणाले, राज्यात कुणाचेही सरकार असले तरी देशाला नरेंद्र मोदींसारखं नेतृत्व असावं. त्यांना आणखी पाच वर्षे मिळाली तर ते देशाला  प्रगतीपथावर नेतील. लोकसभा निवडणुकीत माणमधून भाजपा उमेदवाराला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळणारी मते दाखवून देवू. माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला शंभर टक्के थांबवण्याचा प्रयत्न माझे कार्यकर्ते करतील. त्यासाठी माझी स्वतंत्र यंत्रणा असेल.  फलटणमध्ये जावून त्यांचा प्रचार करायला कुणाला घाबरत नाही. घाट उतरुन जायला कधीही तयार आहे. त्याठिकाणी कुणाची दहशत आहे का? असा प्रतिसवाल त्यांनी केला.  ते पुढे म्हणाले, मी क्लेमसाठी किंवा राजकीय फायद्यासाठी राजकारण केले नाही. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली त्यावेळी  टेंभू, उरमोडी, जिहे-कठापूर या पाणी योजनांना निधी देण्यासाठी मदत करावी, अशी  त्यांना विनंती केली. आमदारकीपेक्षा पाणीयोजना पूर्ण करणे महत्वाचे आहे. आमचा संवाद मेळावा नव्हता तर  ती प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती. सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करुन त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडावी, असा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीतून बाहेर पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीत गेल्याचा पश्‍चाताप होतोय का? असे विचारले असता शेखर गोरे म्हणाले, निवडणुकीत तडजोडी कराव्या लागल्या. मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीतून माण-खटावची जागा रासपला गेली. त्यामुळे त्या पक्षातून निवडणूक लढली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याचा पश्‍चाताप होतोय. राष्ट्रवादीची काम करण्याची पध्दत सर्वांना माहित आहे. माणमध्ये एकही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्यासारखी परिस्थिती नसताना जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करुन गटागटात, गावागावात राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस  जिल्हाध्यक्षांना भाजपमध्ये पाठवून जयकुमार गोरेंनी तुमचा भाजप प्रवेश थांबवला  आणि गोची केली का? भाजपच्या स्थानिक नेत्यांना तुम्ही पक्षात आलेले आवडेल का? मोक्‍काअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करणार्‍या डॉ. येळगावकरांशी कसं जुळवून घेणार? असे विचारले असता शेखर गोरे म्हणाले, असं अजितबात नाही. कुणी कुणाचा रस्ता अडवला म्हणून तो कार्यकर्ता तिथपर्यंत पोहोचू शकत नाही असं होत नाही. माझा सध्यातरी भाजप प्रवेश नाही. सध्या भाजप उमेदवाराला ताकदीने पाठिंबा देतोय. भाजप पदाधिकार्‍यांनी मला विरोध करण्याऐवजी    त्यांच्या उमेदवाराला माझ्यासरखा तगडा माणूस मिळत असेल तर ते स्वागत करतील. येळगावकरांनी त्यांचं वैयक्‍तिक मत मांडलं असेल.  कावळा बसायला आणि फांदी मोडायला असं झालं असेल, असेही त्यांनी सांगितलं.

प्रभाकर देशमुख तुमचे स्पर्धक आहेत का? असे विचारले असता ते म्हणाले, कोण प्रभाकर देशमुख? अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे पण राजकारणात त्यांचे योगदान काय? त्यांनी माझ्यावर टीका केली असली तरी त्यांनी पहिल्यांदा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ताब्यात घ्यावी. आमदारकीला उभं रहा किंवा खासदारकीला उभं राहवून पंतप्रधान म्हणून त्यांनी जावं. पण त्यांनी पहिल्यांदा कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात सहभागी व्हावं. त्यांना मी प्रतिस्पर्धी कधीच मानलंच नाही. माझा राजकीय शत्रू काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जयकुमार गोरे भाजपमध्ये गेल्यावर तुमची काय भूमिका असेल, असे विचारले असता शेखर गोरे म्हणाले,  मी भाजमध्ये अद्याप गेलेलो नाही. जयकुमार  हे भाजपमध्ये गेले तर मी अपक्ष म्हणून लढू शकतो. तशी माझी तयारी आहे. ते काहीही करु शकतात. त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्यांच्याबरोबर कधीही तडजोड करणार नाही. आम्ही दोघे कधीही एकत्र येणार नाही. राजकारणात जयकुमार गोरे हे माझे  विरोधक आहेत.  त्यांच्याबरोबर कॉम्प्रमाइज करण्यापेक्षा राजकारण सोडेन. गेली सात वर्षे त्यांच्यासोबत माझी लढाई सुरु आहे. बर्‍याचजणांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा, लोकसभेच्या ऑफर ठेवल्या पण एकत्र आलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माण तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments