Header Ads

२३ वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार प्रा.डॉ.श्रीधर मधुकर उपाख्य राजा दीक्षित यांना जाहीर satara

सातारा : रा.ना.चव्हाण प्रतिष्ठान, वाई यांच्यावतीने देण्यात येणारा २३ वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या आंतरप्रणाली अभ्यासकेंद्राचे माजी विभागप्रमुख व नवी दिल्ली येथील भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे सदस्य यावर्षी प्रा.डॉ.श्रीधर मधुकर उपाख्य राजा दीक्षित यांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे ज्येष्ठ विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते, दलितमित्र संभाजीराव पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विश्वस्त रवींद्र चव्हाण, सतीश कुलकर्णी, रमेश चव्हाण, शरद चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. या पुरस्काराचे वितरण रा.ना. चव्हाण यांच्या २६ व्या स्मृतीदिनी म्हणजे १० एप्रिल २०१९ रोजी ब्राह्मसमाज रविवार पेठ, वाई येथे सकाळी ९.३० वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत डॉ.बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत  व समीक्षक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

दलितमित्र रा.ना.चव्हाण यांनी ज्यांच्या प्रेरणेने आपले प्रबोधनपर साहित्य समृध्द व समर्थ केले त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात,संशोधन क्षेत्रात व साहित्यिक क्षेत्रात भरीव कामगिरी व कार्य करणार्‍या व्यक्तीस दरवर्षी सन्मानपूर्वक दिला जातो.यंदाचा हा 23 वा पुरस्कार प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी प्रा. डॉ. श्रीधर मधुकर उपाख्य राजा दीक्षित  यांना देण्याचे निश्चित केले आहे.स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. महर्षी शिंदे पुरस्कार हा दरवर्षी वाई येथे रा.ना.चव्हाण प्रतिष्ठान, सातारा येथील बॅरिस्टर पी.जी.पाटील सार्वजनिक वाचनालय, तेजस्वीनी केटरर्स उद्योग समुह, महाराणी ताराबाई महिला सहकारी पतसंस्था,ब्राम्हो समाज वाई,व शिवाजी वाचनालय,वाई यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येतो.

No comments