Header Ads

५८ वर्षीय महिलेला केले जटामुक्त ; तारळे व सातारा अंनिसचा संयुक्त उपक्रम satara

सातारा : गेली जवळपास १० वर्षे अत्यंत क्लिष्ट अशा डोक्यावरील जटेच्या बंधनात अडकलेल्या व जटेमुळे मनाचा कोंडमारा झालेल्या व त्यामुळे डोके सतत जड वाटणे, एकटेपणा जाणवणे, सतत डोकेदुखीचा त्रास अशा विचित्र अवस्थेत व मनस्थितीत असलेल्या शरयू विलासराव वारंग, रा.तारळे, ता.पाटण, जि.सातारा या महिलेला जटामुक्त करण्यासाठी महा.अंनिसला यश आले.

वारंग कुटुंबीय व नातेवाईक यांचे मत परिवर्तन करण्यासाठी तारळे शाखेचे व सातारा जिल्हा अंनिसचे उपाध्यक्ष विलास भांदिर्गे आणि सोशल मिडिया व्यवस्थापन कार्यवाह प्रभाकर शिंदे यांचे समुपदेशन महत्वाचे ठरले. सातारा येथील परिवर्तन संस्थेमध्ये उदय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जवळपास दीड ते दोन तास या क्लिष्ट जटा सोडवण्याचे कामकाज सातारा शाखेचे कार्याध्यक्ष हौसेराव धुमाळ, जिल्हा प्रधान सचिव वंदना माने, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, जयप्रकाश जाधव यांच्या सहकार्याने पार पडले. जटा मुक्त झाल्यानंतर खूप हलके वाटत आहे आणि मी अत्यंत समाधानी आहे. यापुढे जर मला कोणी जटायुक्त महिला दिसल्यास त्यांना जटामुक्त करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू असे उद्गार जटामुक्त महिलेने व तिच्या निलेश या युवा मुलाने काढले. या सर्वांचे अभिनंदन महा.अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोलकर यांनी केले. अशा प्रकारच्या जटा येण्यामागे, देव , दैव हे कारणीभूत नसून केवळ शारीरिक अस्वच्छता , केसांच्या योग्य निगराणीकडे झालेले दुर्लक्ष हे कारण असते. जटा काढल्याने कोणत्याही देवाचा अथवा देवीचा कोप होत नाही. त्यामुळे अशा स्वरूपाच्या जटा निर्मूलन करण्याची इच्छा असलेल्या कोणाही व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र अंनिसशी संपर्क साधावा असे आवाहन महा.अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी केले आहे.

No comments