Header Ads

सातारा जिल्ह्यात घटनाकार डॉ. आंबेडकर जयंतीची जोरदार तयारी satara

सातारा : महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातार्‍यातील हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर जगभरात विद्येसाठी भ्रमंती करणार्‍या डॉ. आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहून इतिहास रचला. त्यांच्या १२८ व्या जयंती निमित्त ऐन निवडणूकीच्या तोंडावर सातारा जिल्ह्यात डॉ. आंबेडकर जयंतीसाठी सर्व स्तरातून जोरदार तयारी सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवारांना दलित व मागासवर्गीय मतांची आस लागल्यामुळे वाड्या-वस्तीतील कार्यकर्त्यांना आता पासूनच संपर्क करण्यास सुरूवात झाली आहे.

सातारा जिल्हा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तव्य आणि त्यांना मिळालेली मोलाची साथ आजही इतिहासकारांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरलेले आहे. त्यांचे बालपण सातारा शहरातील कॅम्प(सदर बझार) या ठिकाणी गेले आहे. तर प्राथमिक शिक्षण हे छत्रपतींच्या राजवाडा येथील सातारा हायस्कूलमध्ये झाले आहे. जातीयतेमुळे त्यांना सातारा येथील मसूर रेल्वे स्थानकापासून बैलाच्या छकड्यातून जाताना पहिले चटके जातीयतेचे बसले. ते दलित असल्यामुळे छकडा चालकाने त्यांना भाडे देऊन सुद्धा छकड्यात बसण्यास नकार दिला होता. डॉ. आंबेडकर यांची मातोश्री भीमाई व मामा सपकाळ यांचे निधन सातारा येथे झाले असून मिलिंद सोसायटी, सदर बझार याठिकाणी त्यांची समाधी ही होती. डॉ. आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या स्थापनेनंतर सातारा मतदार संघातून माहुलीचे शिल्पकार खंडेराव सावंत यांना पहिले आमदार केले होते. सातारा जिल्ह्यातील ल्हासूर्णे ता. कोरेगाव येथील नवलू उबाळे, लोणंदचे खरात, आरळे येथील नाना भोसले, कुसुंबी येथील जे.के. माने अशा मातब्बर मंडळींनी त्यांच्या समवेत काम केले होते. त्यानंतर अनेक जाती-जमातीच्या पुरोगामी कार्यकर्त्यांनी आंबेडकर चळवळीत योगदान दिले आहे. मुळचे सकपाळ आडनाव असलेल्या डॉ बाबासाहेबांना आंबेडकर हे नाव १८९६ साली सातार्‍यातील आंबेडकर या ब्राह्मण गुरूजींकडून लाभले होते.अशी माहिती जाणकार देत आहेत. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील, उद्योजक धनजी शहा कुपर, फलटणचे मालोजीराजे नाईक-निंबाळकर अशा मान्यवरांची साथ लाभली होती. त्याच सातारा जिल्ह्यात सध्या डॉ. आंबेडकर जयंतीच्या तयारीसाठी वाड्या-वस्तींमधून जोरदार तयारी सुरू झाली आहे. तसेच शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्याची स्वच्छता, सुशोभीकरण कामे होवू लागली आहेत. आंबेडकर जयंतीसाठी झेंडे, बॅच, पताके, विद्युत रोषणाई, पुष्पहार व पुस्तके विक्रीसाठी साहित्य आले आहे. दरवर्षी सातारा शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते भेट देतात. तसेच भव्य मिरवणूक ही काढण्यात येते.

लोकसभा निवडणुकीच्या काळातच आंबेडकर जयंती असल्याने १४ एप्रिल रोजी यांना डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उमेदवारांसह राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच विविध संघटनेचे मागासर्गीय कार्यकर्ते डॉ. आंबेडकरांच्या  पुतळ्याला भेट देणार आहेत. त्यामुळे यंदाच्या आंबेडकर जयंतीसाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली आहे. आंबेडकरी भिमगीते, जलसा, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम यासह व्याख्याने आयोजित करण्यात येतात. सातारा जिल्ह्यातील वाड्या-वस्तीत आंबेडकर जयंतीच्या बैठका सुरू असून मिरवणूक व इतर कार्यक्रमासाठी शासकीय पातळीवर परवानगी घेण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले असल्याची माहिती बौद्ध विकास सेवा संघाचे अध्यक्ष प्रेमानंद जगताप, उत्सव समितीचे अमर गायकवाड, सागर भिसे, राजेंद्र ओव्हाळ व रिपब्लिकन ब्ल्यू फॉर्सचे मदन खंकाळ यांनी दिली आहे. 

No comments