Header Ads

अंडाशय फुटल्याने ५५ वर्षीय महिलेच्या पोटात साचले ३ लिटर रक्त ; ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे ५५ वर्षीय महिलेला मिळाली नवसंजीवनी satara

सातारा : आँन्को लाईफ कँन्सर सेंटर येथील डॉ.मनोज लोखंडे आणि त्यांच्या टिमने केलेल्या तातडीच्या यशस्वी शस्त्रक्रियेने ५५ वर्षीय सौ.सरीता पाटील यांना नवसंजीवनी मिळाली आहे. ओटीपोटात दुखत असल्याची समस्या घेऊन आलेल्या सौ. पाटील यांच्या गर्भपिशवीतून तब्बल ३ लिटर रक्त काढण्यात आले. पोटात प्रचंड वेदना आणि भोवळ येत असल्याची समस्या घेऊन ५५ वर्षीय सौ. सरीता पाटील (नाव बदलले आहे) ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये दाखल झाल्या. त्यांच्याकडे पूर्वीचे सोनोग्राफी रिपोर्ट्स होते. ऑन्को लाईफ सेंटरमधील डॉ.मनोज लोखंडे आणि एचडीयू (हाय डिपेन्डन्सी युनिट) ओटी (ऑपरेशन थिएटर) आणि ऍनास्थेशिया(भूल विभाग) टीमने सांगितले की, त्यांच्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे कारण त्यांच्या पोटात आणि डाव्या बाजूच्या फ़ुटलेल्या ओव्हरीमध्ये २.५ ते ३ लीटर रक्त जमा झाले आहे. महिलेचे वय जसजसे वाढत जाते तसतशी त्यांना अंडाशयाचा कर्करोग होण्याची शक्यताही बळावते. ५० वर्षांवरील महिलांना जास्त धोका असतो आणि बहुतेक प्रकरणांमध्ये अंडाशयाचा कर्करोग रजोनिवृत्ती आलेल्या महिलांना होण्याची शक्यता अधिक असते. अंडाशयात ट्युमर असेल तर पोटात वेदना होतात, पोटात गोळा तयार होतो किंवा आतील बाजूने सुज येते, पण काही प्रकरणांमध्ये ते फुटते किंवा त्याला पीळ पडतो आणि पोटात खूप वेदना होतात. ऑन्को लाईफ कँन्सर सेंटरमधील ऑन्को सर्जन डॉ. लोखंडे म्हणाले, "रुग्ण सेंटरमध्ये संध्याकाळी ५.३० वाजता दाखल झाल्या. त्यांचा रक्तदाब कमी झाला होता आणि पोटात प्रचंड वेदना होत होत्या. आम्ही त्यांना ताबडतोब शस्त्रक्रियेसाठी तयार केले आणि सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. आम्हाला त्यांच्या पोटात २.५ ते ३ लिटर रक्त मिळाले. सामान्य प्रकृती असलेल्या प्रौढामध्ये १.२ ते १.५ गॅलन (४.५ ते ५ लिटर) रक्त संपूर्ण शरीरात फिरत असते. त्याचप्रमाणे डाव्या बाजूच्या अंडाशयातील ट्युमर फुटून सुमारे २० सेमी लांब आणि २० सेमी रुंदीची फट तयार झाली होती आणि सगळीकडून रक्तस्त्राव होत होता." परंतु शस्त्रक्रियेनंतर आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

No comments