Header Ads

आ. जयकुमार गोरे काँग्रेसमध्येच : पृथ्वीराज चव्हाण karad

कराड : सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांतील राजकारण रोज नवे वळण घेत आहे. काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी माढा मतदारसंघात सेना-भाजप युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितल्यानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, शुक्रवारी आ. जयकुमार गोरे यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची कराडमध्ये भेट घेतली. जयकुमार काँग्रेसमध्येच असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. सकारात्मक तोडगा निघेल; मात्र माण व खटावमधील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आघाडीसोबत एकनिष्ठ राहावे, असे आवाहन आ. चव्हाण यांनी केले.

लोकसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची  आघाडीची घोषणा झाल्यापासून आ. जयकुमार गोरे अस्वस्थ होते. अनेक वेळा त्यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली होती; मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जयकुमार गोरेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे नाराज जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी दोनच दिवसांपूर्वी माढा मतदारसंघातील सेना-भाजप युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. बोराटवाडी (ता. माण) येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली होती. आ. गोरे यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेससह आघाडीत चांगलीच खळबळ उडाली होती. यानंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांंनी आ. गोरे यांच्याशी चर्चा केली; मात्र गोेरे आपल्या भूमिकेवर ठार राहिले होते. 

शुक्रवारी आ. गोरे यांनी आ. चव्हाण यांची कराडमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. याचवेळी माण-खटावमधील काँग्रेसचे पदाधिकारी व काही मोजके कार्यकर्ते आ. चव्हाण यांची भेट घेण्यासाठी कराडमध्ये दाखल झाले. ही भेट एका खासगी हॉटेलमध्ये झाली. नेमक्या त्याचवेळी आ. गोरे कार्यकर्त्यांसोबत तेथे आले. यावेळी  काँग्रेस आणि आ. गोरे समर्थक एकत्र आल्याने उत्सुकता ताणली गेली होती. आ. चव्हाण यांची भेट घेऊन आ. गोरे काही वेळातच तेथून निघून गेले.

यानंतर काँग्रेस पदाधिकार्‍यांनी भावना व्यक्‍त करताना आम्ही कोणती भूमिका घ्यायची, असा नाराजीचा सूर आळवला. त्यावेळी आ. चव्हाण म्हणाले, कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. आ. गोरे अद्याप काँग्रेसमध्ये आहेत. त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आघाडीसोबत ठाम राहावे. सातारा, माढा मतदारसंघांतील एकही मत इकडे तिकडे जाता कामा नये. आ. गोरे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार का या प्रश्‍नावर आ. चव्हाण यांनी याबाबत चर्चा झाली नसल्याचे सांगितले. दरम्यान आ. आनंदराव पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले, माण खटाव मधील पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेससोबत एकनिष्ठ आहेत. त्यांची खदखद ते माझ्यासमोर मांडण्यासाठी आले होते. त्याची दखल घेणे माझे काम आहे. 

No comments