Header Ads

विद्यमान खासदारांकडून सातारा लोकसभा मतदार संघातील जनतेचे नुकसान : नरेंद्र पाटील karad

कराड : विद्यमान खासदारांना निधी वापरायची माहिती नसून पाच वर्षातील २५ कोटी निधीपैकी फक्त १२ कोटी निधीचा वापर झाला असून उर्वरित निधी परत गेला आहे. हे विद्यमान खासदारांचे नुकसान नसून सातारा लोकसभा मतदार संघातील सर्व जनतेचे नुकसान आहे. यामुळेच सामान्य लोक या निवडणुकीत पुढकार घेऊन परिवर्तन घडवतील, असा विश्‍वास शिवसेना, भाजपा, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. मलकापूर ता.कराड येथे शिवसेना, भाजपा, रिपाई व मित्रपक्ष महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना.शेखर चरेगावकर, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष ना. नितीन बानगुडे-पाटील, विठ्ठल रुक्मिणी समितीचे ट्रस्टचे अध्यक्ष, भाजपा प्रदेश चिटणीस ना.डॉ. अतुल भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपा कार्यकारिणी सदस्य भरत पाटील, कराड उत्तर भाजपा नेते मनोज घोरपडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, कराड तालुकाप्रमुख शशिकांत हापसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले, मतदार संघात फिरत असताना मी विद्यमान खासदारांनी काय विकास केला आहे हे शोधतोय. विकास काय करायचा हे ठरलेला आहे. मात्र खासदार फंडही विद्यमान खासदारांना वापरता आला नसून पाच वर्षात 25 कोटी रुपये निधी पैकी फक्त 12 कोटी रुपये वापरला आहे. उर्वरित निधी हा सरकारकडे जमा झालेला आहे. हे नुकसान खासदारांचे नसून सातारकर जनतेचे झाले आहे. त्यामुळे हा निधी कसा वापरायचा याचा पाठ घेणे गरजेचे आहे. कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांची सेवा करणे, विकास निधी देणे, लोकांची दैनंदिन कामे पूर्णत्वाला नेणे, ही तुमची जबाबदारी आहे. हे तुम्हाला जमत नाही. हे लोकांच्या लक्षात आले आहे. यामुळे सामान्य लोक या निवडणुकीत पुढाकार घेऊन लोक नक्कीच परिवर्तन करतील.

शेखर चरेगावकर म्हणाले,  ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकींच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे मताधिक्क्य वाढले आहे. यामुळे सर्वच मतदार संघातून कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे प्रचाराला गती आली आहे. महायुतीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन कोणत्याही परिस्थिती सातारा लोकसभा मतदार संघातील जागा निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांच्यामुळे पाटणमधून मोठा उत्साह आहे.  मध्यवर्ती यंत्रणा या प्रचार कार्यालयातून कार्यान्वित केली जाईल.  ना.नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा, कष्टकरी, कामकरी यांच्या समस्या जाणून घेणारा नेता ही नरेंद्र पाटील यांची ओळख आहे.  निश्‍चितपणे सातारा जिल्ह्याच्या समस्यांवर आणि विकासाच्या दृष्टीने गतीशील प्रगतीने नरेंद्र पाटील हे उत्तम उत्तर ठरतील. त्यामुळे आजचे हे प्रचार कार्यालय हे उद्याच्या निवडणूक निकालानंतर विजयी कार्यालय ठरेल, असा मला विश्‍वास आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व शिवसैनिक व महायुतीमधील सर्व मित्रपक्षातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले. डॉ. अतुल भोसले म्हणाले, स्व. अण्णसाहेब पाटील यांनी विशेषतः माथाडी लोकांसाठी खूप मोठे काम आहे. त्यांच्या कार्याचा उल्लेख राज्यभर केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत. विक्रम पावसकर म्हणाले, दडपशाहीला युतीचा कार्यकर्ता भिक घालत नाहीत. स्थानिक पातळीवरील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नरेंद्र पाटील यांना विजयी करण्याचा विडा उचलला आहे. यावेळी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई व मित्रपक्षाचे प्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments