Header Ads

फलटणचे ‘डीवायएसपी’ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात crime

सातारा : फलटण पोलिस उपविभागीय कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) डॉ.अभिजित पाटील यांना अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे व सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस जिल्हा दौर्‍यावर असताना ही कारवाई झाल्याने पोलिस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत अधिक माहिती अशी, डीवायएसपी डॉ. अभिजित पाटील यांनी एका प्रकरणात अडीच लाख रुपयांच्या लाचेची एकाकडे मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यानंतर अडीच लाख रुपयांवरून तडजोडीअंती सुमारे दीड लाख रुपयांची सेटलमेंट ठरली. लाचेची रक्कम बुधवारी स्वीकारणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे एसीबी विभाग फलटणमध्ये आला. लाचेसंबंधी एसीबीचे पथक फलटणमध्ये आल्याचे समोर आल्यानंतर डीवायएसपी डॉ.अभिजीत पाटील हे नाट्यमयरित्या बेपत्ता झाले. घटनेची व्याप्ती वाढल्याने अखेर पुणे एसीबीने सातारा एसीबी विभागाला याची माहिती देवून मदतीसाठी पाचारण केले. तोपर्यंत लाचेसंबंधीची माहिती फलटण येथे पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुमारे एक तासानंतर डीवायएसपी डॉ.अभिजीत पाटील हे एसीबी पथकाला सापडले. एसीबी पथकाने त्यांच्याकडे प्राथमिक चौकशीला सुरुवात केली. फलटणमध्येच ही कारवाई झाल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली.

दरम्यान, बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे प्रचारासाठी सायंकाळी आले होते. एकीकडे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री जिल्ह्यात असताना दुसरीकडे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी लाचखोरीप्रकरणात सापडल्याने चर्चेला अक्षरश: उधाण आले. रात्री उशीरापर्यंत डॉ.अभिजीत पाटील यांच्याकडे चौकशी सुरु असल्याने त्याबाबत अधिक तपशील समजू शकला नाही. यासंदर्भात एसीबीच्या पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा देवून डीवायएसपी डॉ.अभिजीत पाटील यांना ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. दरम्यान, या सर्व कारवाईसाठी एकूण तीन पथके तयार करण्यात आली होती व त्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती.

No comments